चिंचवड पोस्ट कार्यालयात आधार केंद्राचे लोकार्पण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/photo-2-1.jpg)
पिंपरी- मावळ लोकसभा मतदार संघातील १९ व्या विभागीय पोस्ट कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचा लोकार्पण चिंचवड येथील मुख्य पोस्ट कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पुणे विभागाचे क्षेत्रीय पोस्ट कार्यालय अधिकारी अभिजीत बनसोडे तसेच पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, पोस्ट विभागाचे अधिकारी सामदास गायकवाड व के.आर.कोरडे उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या संचार मंत्रालयाच्या द्वारे क्षेत्रीय पोस्ट कार्यालयामध्ये नागरीकांच्या सोयीसाठी आधार केंद्र सुरू करण्याच्या सुचना मंत्रालयाच्या माध्यमातुन देण्यात आल्या आहे. त्याच अनुशंगाने मावळ लोकसभा मतदार संघातील १९ विभागीय पोस्ट ऑफीस कार्यालयात एकाच वेळी आधार केंद्राची सुरवात करण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते चिंचवड येथील पोस्ट ऑफीस कार्यालयात करण्यात आला. यामध्ये चिंचवड स्टेशन चिंचवडगांव, आकुर्डी, औधकॅम्प, सि.एम.ई (दापोडी), दापोडी, कासारवाडी पिंपरी चिंचवड प्राधिकरण कार्यालय, पिंपळेगुरव, पिंपरी कॅम्प, पिंपरीगांव, देहु, देहुरोड कॅन्टोमेंट बोर्ड, तळेगाव, तळेगाव स्टेशन ,वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा, लोणावळा बाजार या ठिकाणी आधार केंद्राची सुरवात करण्यात आली. या प्रसंगी कार्यालयात उत्तम काम करणारे कर्मचारी तसेच पोस्टमनचा सन्मान खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले म्हणाले, पिंपरी चिंचवडला खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातुन सुरू झालेले पासपोर्ट सेवा केंद्र देशातील सर्वाधिक पासपोर्ट देणारे केंद्र ठरले असून दररोज २७५ नागरिकांना पिंपरी येथील पासपोर्ट सेवा केंद्रातुन नवीन पासपोर्ट काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी लाभ मिळत आहे. या सेवेचा फायदा अनेक नागरिकांना होत असून केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातून चांगली सोय उपलब्ध करण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घेण्याची सूचना त्यांनी केली. कार्यक्रमाचे के. आर. कोरडे यांनी आभार मानले.