‘गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज ‘
!['Collective efforts needed to solve housing society's problems'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/sankul.jpg)
संकुल सुविधा ‘ आयोजित संवाद कार्यक्रमातील सूर
गृहनिर्माण संस्थांसाठी ‘ संकुल सुविधा ‘ हेल्पलाईनचा प्रारंभ
पुणे | प्रतिनिधी
शहरांमध्ये गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत असताना, विविध सेवांची गरज तयार होत आहे. या समस्या, अडचणी सोडविण्यास गृहनिर्माण संस्थांना वेळ अपुरा पडतो.गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. तरुण पिढीने त्यात पुढाकार घेतला पाहिजे’ असा सूर ‘ संकुल सुविधा ‘ आयोजित संवाद कार्यक्रमात उमटला.
गृहनिर्माण संस्थांसाठी सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा देणाऱ्या ‘ संकुल सुविधा ‘ या हेल्पलाईनचा प्रारंभ रविवारी बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडचे संस्थापक हणमंत गायकवाड, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्या हस्ते झाला. यावेळी ‘ गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने ‘ या विषयावरील संवाद कार्यक्रमात मान्यवरांनी मते मांडली. सदाशिव पेठ, पुणे येथील ज्ञानेश्वर नरहरे सभागृह, प्रेस्टीज पॉईंट येथे हा कार्यक्रम झाला.
बीव्हीजी. इंडिया लिमिटेडचे संस्थापक हणमंत गायकवाड, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे सिंहगड रस्ता विभाग अध्यक्ष समीर रुपदे, रोटरी क्लबच्या सेवा विभागाचे संचालक अभय जोशी, डॉ. विवेक येळगावकर, शंतनू येळगावकर या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले.
हणमंत गायकवाड म्हणाले, ‘ सेवा क्षेत्रात कामाच्या चांगल्या संधी आहेत. सेवा क्षेत्रात काम करताना आपण बरे किंवा उत्तम असून चालत नाही, सर्वोत्तम असावे लागते. या क्षेत्रात काम करताना आधुनिकतेचा वसा घ्या. कारण पुढील काळात स्वच्छता करण्याचे काम रोबो करेल. तसेच सरकारी नियमांमध्ये आता पळवाट काढता येत नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे.
स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अभय जोशी, डॉ. विवेक येळगावकर, समीर रुपदे व्यासपिठावर उपस्थित होते. दशरथ कुऱ्हाडकर, महेश भुरे, सुधीर कुऱ्हाडकर यांनी स्वागत आणि संयोजन केले.