गावात दवाखाना चालवायचा असेल तर २५ हजार महिना द्यावा लागेल
पुणे |महाईन्यूज|
शिक्रापूर (ता .शिरूर) येथे दवाखाना चालवायचा असेल तर महिन्याला २५ हजार रुपये द्यावे लागेल. नाहीतर दवाखाना चालू देणार नाही. तसेच तुझ्याविरुद्ध खोटया तक्रारी दाखल करू, असे धमकावून पैसे मागितल्याप्रकरणी शिक्रापुरच्या माजी सरपंचाविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत रामेश्वर बंडगर (मुळ रा.सोईट, पो.धानोरा, ता.उमरखेड, जि.यवतमाळ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (वय २८, रा. माळीमळा शिक्रापूर, ता. शिरूर) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचा शिक्रापूर गावात दवाखाना आहे.१० दिवसांपूर्वी २४ ऑक्टोबर रोजी शिक्रापूर गावचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी रामेश्वर बंडगर यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले व तुला शिक्रापूर गावाच्या हद्दीत हॉस्पिटल चालवायचे असेल तर महिन्याला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर दवाखाना चालू देणार नाही, तसेच खोटया तक्रारी दाखल करू असे म्हणून पैसे मागितले. याप्रकरणी माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक तपास पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयुर वैरागकर करत आहेत.