खा. अमोल कोल्हे यांच्याकडून शहीद जवान संभाजी राळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
पुणे | प्रतिनिधी
खेड तालुक्यातील कोये कुरकुंडी गावचे सुपुत्र शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले. अविवाहित असलेल्या संभाजी यांचे यंदा लग्न होणार होते. मात्र तत्पूर्वीच देशासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बाब मनाला चटका लावणारी बाब असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी या वेळी सांगितले.
खा. कोल्हे म्हणाले की, या घटनेमुळे राळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातला एकमेव कर्ता पुत्र देशसेवा करताना गमावला गेला आहे. त्यामुळे मी तसेच आमदार मोहिते पाटील आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी असून राळे कुटुंबाला आमच्याकडून सर्व प्रकारची मदत करु, असा शब्द डॉ. कोल्हे यांनी दिला. या वेळी संभाजी यांच्या भगिनीने लष्करात भरती होऊन आपल्या बंधुप्रमाणे देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. खासदार डॉ. कोल्हे व आमदार मोहिते पाटील यांनी त्यासाठी शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, रमेश राळे, अरुण चांभारे, अॅड. मनीषा पवळे, माणिक कदम, युवराज पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष निलेश काळे, सोशल मिडियाचे अध्यक्ष विलास मोहिते पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मयूर वाडेकर, कांचनताई ढमाले आदी या वेळी उपस्थित होते.