खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरील निकाल ठेवला राखून!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/11-3.jpg)
सोलापूर |महाईन्यूज|
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या बेडा जंगम या जात प्रमाणपत्राविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची जात पडताळणी समितीसमोर शनिवारी सुनावणी संपली. जात पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ यांनी निकाल राखून ठेवण्यात आल्याचे सांगितले.
खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे वकील संतोष नावकर यांनी दक्षता पडताळणी समितीने फसल उता-याबाबत दाखल केलेल्या अहवालावर आक्षेप घेतला़ आम्हाला या दक्षता पडताळणी समितीचा अहवाल मान्य नाही, त्रयस्थ दक्षता पडताळणी समितीमार्फत याची चौकशी व्हावी, पुराव्यादाखल आम्ही सादर केलेला फसल उतारा जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या वडिलांचा आहे. याच्या पुष्ट्यर्थ तलमोडचे पाटील यांचे प्रतिज्ञापत्र त्यांनी आज जात पडताळणी समितीसमोर सादर केले. न्हावकर यांनी दाखल केलेले सर्व अर्ज जात प्रमाणपत्र समितीने फेटाळले व चार दिवसात निकाल देण्यात येईल असे स्पष्ट केले.