खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-१९ सॅम्पल तपासणी क्षमता वाढवावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-१९ ची सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी अशी सूचना, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-१९ ची सॅम्पल तपासणीसाठी येत असतात. त्या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी, इतर साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत.
आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही राम यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या शॅम्पल तपासणीबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी खासगी आणि शासकीय कोविड-१९ ची सॅम्पल तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.