क्षमतांचा व बुध्दीचा वापर केल्यास विद्यार्थी देशासाठी मोठे कार्य करतील- राज्यपाल कोश्यारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-9.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पदवी मिळाल्यानंतर पुढे काय? असा विचार न करता,विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित करावे. तसेच केवळ नोकरीमध्ये गुंतून न राहता क्षमतांचा व बुध्दीचा वापर केल्यास विद्यार्थी देशासाठी मोठे कार्य करू शकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल व सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११६ वा पदवीप्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.या कार्यक्रमाला हरियाणामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. गगनदीप कंग ,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील काजल पंडित महाजन या विद्यार्थीनीला शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासेतर उपक्रम, सामाजिक कार्य, खेळ व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय सहभागासाठी ‘दी प्रेसिडेंट आॅफ इंडिया शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक ’ प्रदान करण्यात आले.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, देशात नोक-या नाहीत असे मानणे चूकीचे आहे. आपण जगातून अनेक गोष्टी आयात करतो.त्यामुळे देशातील श्रमशक्तीचा आपण व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. मन्युष्यबळाचा व बुध्दीचा योग्य उपयोग केला तर आपण काहीही करू शकतो.
यावेळी कुलगुरू डॉ. करमळकर यांनी विद्यापीठातर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांचा आढावा मांडला.पदवी प्रदान समारंभात एक लाख 9 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.,पदव्युत्तर पदवी व पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.