कोरोना संकट : स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी पुण्यात अडकले, उपाशी राहण्याची वेळ
पुणे – शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात गेल्या पाच दिवसांपासून विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वास्तव्यास आलेले शेकडो विद्यार्थी अडकून पडले असून अनेकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. राज्यातील सर्व जिल्हे सील केल्याने कुणीही विद्यार्थी आपल्या गावी जाऊ शकत नाही आणि इथे त्यांना दोन वेळच्या जेवणाची समस्या निर्माण झाली आहे.
पुण्यात देश-विदेशांतून जसे अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात तसेच विविध स्पर्धा परीक्षांची आणि त्यासाठीच्या अभ्यासाची तयारी करण्यासाठीही हजारो विद्यार्थी येतात. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र येथील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) या स्पर्धा परीक्षांसाठी सर्वाधिक विद्यार्थी पुण्यात वास्तव्यास असतात. स्पर्धा परीक्षांचे कोचिंग क्लासेस, अन्य पूरक उपक्रमांची इथे सतत रेलचेल असते. सर्व विषयांतील तज्ञांची मोठ्या संख्येने उपस्थिती इथे असते. त्यांना प्रत्यक्ष भेटणेही इथे शक्य होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची जणू मांदियाळीच पुण्यात असते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.