कोरोना : लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका, अजित पवार यांचा इशारा
कोरोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना दुर्दैवी आहेत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधक अंमलबजावणीसाठी, लष्कराची मदत घ्यायला लागू नये हे पाहणं आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी, दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. लोक बाजारात, रस्त्यावर ज्या पद्धतीनं गर्दी करत आहेत. सुरक्षित अंतर पाळत नाहीत, यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढत आहे.





