कार्यकाळ संपताच सदस्य निघाले केरळ दौ-यावर
- महिला व बाल कल्याण समितीची मंजुरी
- राष्ट्रवादीच्या सदस्यांचा दौ-यास नकार
पिंपरी – महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीसह चार विषय समित्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ महिनाअखेरला संपत आहे. त्यामुळे जाता-जाता समितीचे सदस्य केरळ दौ-याची हौस भागवणार आहे. त्यासाठी मंगळवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत महिला व बाल कल्याण समितीने याबाबतचा ठराव एकमताने संमत केला आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मात्र, हल्लाबोल आंदोलनामुळे दौ-याला साफ नकार दर्षविला आहे.
महिला लघुउद्योजक व्यावसायिक केंद्राची माहिती घेण्यासाठी केरळचा दौरा करण्यात येणार आहे. दौरा आयोजनाचे काम ऑल इंडिया इन्स्टिट्युटला थेट पद्धतीने देण्यास समितीने मंजुरी दिली आहे. याबाबतचा ठराव उपसभापती योगिता नागरगोजे यांनी मांडला होता. त्याला नगरसेविका चंदा लोखंडे यांनी अनुमोदन दिले. महिला व बालकल्याण समितीचे सदस्य केरळ सरकारने महिलांबाबत केलेल्या योजनांची माहिती घेणार आहेत. महिला सक्षमीकरणाबाबत कशापद्धतीने कामकाज केले आहे, याची माहिती अभ्यास दौ-यात घेतली जाणार आहे. हा दौरा आठ दिवसाचा असणार आहे.
या समितीत नऊ सदस्य आहेत. त्यापैकी सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक असे नऊ सदस्य आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आणि 11 एप्रिलला शहरात हल्लाबोल आंदोलन आहे. त्यामुळे आपण दौ-याला जाणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या सदस्या सुलक्षणा धर यांनी सांगितले. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात महिला व बालकल्याण समितीच्या सात सदस्यांनी सिंगापूर दौरा केला होता.