कापड व्यावसायिकांचा लॉकडाउनला विरोध…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/maharashtra-times-2.jpg)
पुणे : करोनाकाळ आणि लॉकडाउन या नैराश्यदायी आणि अर्थकोंडी करणाऱ्या वातावरणातून कपड्यांची बाजारपेठ सावरते ना सावरते तोवर लॉकडाउनच्या चर्चेने व्यावसायिक गोंधळून गेले आहेत. व्यावसायिक आणि कामगारांना जगू द्यायचे असेल, तर यापुढे टाळेबंदी नको, अशी स्पष्ट भूमिका घेऊन कापड व्यावसायिकांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. लग्नसराईसाठी कपड्यांची खरेदी सुरू होत असताना टाळेबंदी करून घास हिरावू नका, असे आवाहन या व्यावसायिकांनी केले आहे.मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर दोन महिन्यांनी जून महिन्यात दुकाने सुरू झाली. दुकानांना अनेक महिने ग्राहकांची प्रतीक्षा राहिल्याने दसरा आणि दिवाळीपर्यंत कपड्यांच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली नाही. दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या खरेदी-विक्रीमुळे व्यावसायिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
‘दसरा आणि दिवाळीदरम्यान चांगला व्यवसाय झाला. आता लग्नसराईच्या निमित्ताने खरेदी होत आहे. बाजारपेठ पूर्वपदावर येऊ लागल्याने व्यावसायिक आणि कामगारांच्या आर्थिक अडचणी कमी होत असताना पुन्हा टाळेबंदी करून संकटात ढकलू नका. पुन्हा व्यवसाय ठप्प झाला, तर व्यावसायिक आणि कामगारांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल,’ असे व्यावसायिकांनी सांगितले. ‘अनलॉकबाबतच्या धरसोड धोरणाचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. आता पुन्हा टाळेबंदी नको; अन्यथा व्यावसायिक आत्मविश्वास गमावून बसतील आणि बाजारपेठ कोसळेल,’ अशी भूमिका व्यावसायिकांनी मांडली. दुकानातील कामगार व येणारे ग्राहक यांच्या आरोग्याची काळजी घेऊन, तसेच सुरक्षित वावराचे नियम पाळून व्यावसायिकांनी नव्या उमेदीने व्यवसायाला सुरुवात केली आहे.