कर्जाला कंटाळून आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या
पिंपरी- आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बबलूकुमार चंद्रेश्वर प्रसाद (वय ३२, रा. आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे. आजारपण आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलूकुमार चंद्रेश्वर प्रसाद हे आकुर्डी येथे राहत. त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात कर्ज झाले होते. अनेकांकडून त्यांनी पैसे उसने घेतले होते. त्यातील मित्रांचे देणे त्यांनी फेडले. पण नातेवाईकांचे पैसे द्यायचे राहिले होते. याच तणावातून बबलूकुमार यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत बबलूकुमार यांनी आजारपणात सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आकुर्डी येथील घरात ते आईबरोबर राहत. दोन वर्षांपूर्वी आजारपणात त्यांचे पाय निकामी झाल्यामुळे ते काढण्यात आले होते. वाढते कर्ज आणि पाय गेल्याने त्यांनी विवाह देखील केला नव्हता अशी माहिती समोर येत आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.