एल्गार प्रकरणातील संशयितांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात
पुणे | महाईन्यूज
एल्गार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांची बुधवारी मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली.
एल्गार प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात आल्यानंतर संशयितांना ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्याची विनंती ‘एनआयए’ने विशेष न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे, वरावरा राव, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, शोमा सेन, वेरनोन गोन्साल्व्हिज यांना बुधवारी ऑर्थर रोड कारागृहात हलविण्यात आले.
एल्गार परिषद प्रकरणात बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अॅड. गडलिंग, राऊत, विल्सन, ढवळे, राव, भारद्वाज, सेन, गोन्साल्व्हिज यांना अटक केली होती. या खटल्याची सुनावणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले होते.
केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पुणे पोलिसांकडून तपास ‘एनआयए’कडे हस्तांतरित करण्यात आला.