एक लाखाच्या फरकाने मी जिंकेन – अजित पवार विश्वास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/ajit-pawar-1565111014.jpg)
पुणे |महाईन्यूज|
मी फुशारक्या मारत नाही. पण बारामती मतदारसंघातून मी किमान एक लाखांच्या मताधिक्याने विजयी होईन, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केला. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार यांनी रॅली काढली होती. त्याला बारामती शहरात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना सव्वा लाखांचे मताधिक्य मिळाले होते. मी कोणतीही फुशारकी मारत नाही. पण या निवडणुकीत माझा किमान एक लाखांच्या मताधिक्याने विजय होईल. मी आतापर्यंत कोणतीही निवडणूक हलकेपणाने घेतलेली नाही. माझ्याविरुद्ध आतापर्यंत मोठे नेते विरोधकांकडून देण्यात आले. तरीही बारामतीकरांनी माझ्यावरच विश्वास टाकला होता.