उजनी धरण पाणलोट क्षेत्रात अवैध मासेमारी; सात आरोपींना केली अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/2mase_0.jpg)
पुणे – उजनी धरण पाणलोट क्षेत्रात लहान माशांची चोरटी मासेमारी करणाऱ्या सात आरोपींना इंदापूर पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून १०८० किलो ग्रॅम वजनाचे १ लाख २ हजार २०० रूपये किमतीचे विविध जातींच्या लहान आकाराची सुकवलेली माशांची पिल्ले जप्त केली. सदर आरोपींना दि. २४ नोव्हेंबर रोजी इंदापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ नोव्हेंबर रोजी शहरातील अकलूज बायपास येथे एका पिकपमध्ये उजनीपाणलोट क्षेत्रात लहान माशांची मासेमारी करून ते सुकवून मासळी बाजारात चढया भावाने विक्रीसाठी काही व्यापारी आल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यामुळे पोलिस नाईक दिपक पालके, पोलिस शिपाई अमित चव्हाण, विशाल चौधर व विक्रमसिंह जाधव यांच्या पथकास तेथे पाठविले असता सरस्वतीनगर अकलूज बायपास येथे पिकअप जीप मध्ये (क्र. एम. एच ४२ ए. क्यु ३०३५) एकूण ४८ सुती गोण्यांत विविध जातींच्या लहान आकाराची सुकवलेली माशांची पिल्ले भरलेली पोती आढळून आली.
जीपमधील नारायण आसाराम बनारे यांना सदर माशां बाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. यावेळी त्यांच्याकडे मासे पकडण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पिकअप मुद्देमालासह पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पाटबंधारे विभागाचे पळसदेव उपविभागिय अभियंता संजय मेटे यांनी नारायण बनारे (वय ४३), दौलु बनारे (वय २१), आकाश बनारे (वय २१), लक्ष्मण बनारे (वय २३ ) ,विलास बनारे (वय १९) ( सर्व जण रा. सरस्वतीनगर इंदापूर ), विठ्ठल गव्हाणे ( वय २६ रा. पळसदेव ता.इंदापूर ), बाळासाहेब चितारे ( वय ३८ रा.पिंपरी खुर्द ता. इंदापूर ), एकनाथ विचारे (वय ३२ रा. कालठण नंबर २ ता. इंदापूर ) यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. आरोपींनी कालठण नंबर २, शिरसोडी, सुगाव,शहा, कांदलगाव, हिंगणगाव हद्दीत नदी पात्रातून मासे पकडून ते सुकवून विक्रीसाठी आणले होते. पुढील तपास पोलिस नाईक दिपक पालके करत आहेत.