breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आईला वाचविताना बहीण-भावाचा मृत्यू

वेल्हे  –  नवरात्रोत्सवासाठी पानशेत येथे धरणाच्या सांडव्यात कपडे धुण्यासाठी आलेली आई पाण्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या बहीण-भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्यात बुडणार्‍या आईचे प्राण वाचविण्यात मृत भावंडांच्या मावस भावाला यश आले. मात्र, दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोककळा पसरली. ही दुर्घटना रविवारी (दि. 7) दुपारी दीड वाजता घडली.

कुणाल दत्तात्रय भगत (वय 16) व वैष्णवी दत्तात्रय भगत (वय 14) अशी मृत बहीण-भावाची नावे आहेत. ते सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील आहेत. आई सविता दत्तात्रय भगत या रविवारी दुपारी रिक्षाने नवरात्रोत्सवासाठी घरातील कपडे घेऊन मेहुणा, त्याच्या मुलांसह पानशेत धरणाच्या सांडव्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत कुणाल व वैष्णवी ही त्यांची मुले होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पानशेतजवळील  धरणाच्या सांडव्याच्या तीरावर कपडे धुवत असताना सविता भगत या तोल जाऊन पाण्यात पडल्या. त्या पाण्यात बुडू लागल्याचे पाहून कुणाल व वैष्णवी जोरजोरात ओरडू लागले. नंतर दोघे भावंडे पाण्यात उतरले असता तेथे असलेल्या त्यांच्या मावस भावाने दोघांना पाण्याबाहेर जाण्यास सांगितले व मावस भावाने खोल पाण्यात उडी मारून मावशी सविता हिला बाहेर काढले.

मात्र तोपर्यंत  कुणाल व वैष्णवी हे खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाले. हा प्रकार पाहून मावस भावाने जोरजोरात आरडाओरडा केला.  त्यानंतर पानशेत येथील माजी सरपंच विलास भिखन तारू, मच्छिमार ईश्‍वर महाडीक व रमेश महाडीक यांनी सांडव्यात बुडून बेपत्ता झालेल्या भावडांचा शोध सुरू केला. वेल्हा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सुवर्णा हुलावन, गणेश लडकत, गरूड आदी घटनास्थळी दाखल झाले. दीड तासानंतर मच्छिमारांनी दोघांचे मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढले. नंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी ससून रुग्णालयात नेले. याप्रकरणी वेल्हा पोलिस तपास करीत आहेत.

अपघाती ठिकाण

पानशेतजवळील आंबी नदीच्या पात्रातील पानशेत धरणाच्या सांडव्यातून वेगाने पाणी वाहात असते. हा भाग खोल असल्याने येथील पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत आहे. पानशेत व वरसगाव धरणाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर हा सांडवा आहे. त्यामुळे पर्यटक तसेच स्थानिक रहिवाशी कपडे धुण्यासाठी तसेच पोहण्यासाठी येथे गर्दी करतात. याच ठिकाणी पाण्यात बुडून पर्यटक तसेच स्थानिकांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे या अपघाती ठिकाणी दुतर्फी संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button