अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
![Let the construction of Ram Mandir in Ayodhya go smoothly: Governor Bhagat Singh Koshyari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/pune-koshyari.jpg)
पुणे । प्रतिनिधी
‘आपला देश करोनामुक्त होवो आणि आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकरात लवकर पूर्ण होवो. तसेच अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो’, अशी प्रार्थना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे केली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या मंदिरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज(दि.२०) अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी, भारत लवकरात लवकर करोनामुक्त होवो, आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकरात लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, अशी प्रार्थना केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, आपण सर्वांनी धर्माचे रक्षण आणि पालन केलं तर आपलं कुटुंब, देश आणि जगाचं कल्याण होईल. तसेच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जी परंपरा सुरु केली आहे, ती आजही सुरु असून भविष्यातही सुरु राहिल. आपणही त्याच मार्गाने पुढे जाऊ, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी खासदार गिरीष बापट आणि ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसेही उपस्थित होते.
गणरायाला महाअभिषेक करताना कोश्यारी यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली. गणरायाला अभिषेक झाल्यानंतर कोश्यारी यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.