अकलूजच्या एव्हरेस्टवीर ‘निहाल’ची मोहीम फत्ते केल्यानंतर निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/1-2.jpg)
अकलूज – अकलूज येथील निहाल बागवान ( वय 26 वर्षे ) या एव्हरेस्टवीराचे मोहीम फत्ते केल्यानंतर श्वसनाच्या त्रासामुळे निधन झाले. यामुळे सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अकलूज येथील निहाल बागवानच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मात्र गिरी, शिखरे पादाक्रांत करण्याची त्याची जिद्द मोठी होती.
गुरुवारी ( दि 23 ) एव्हरेस्ट शिखर सर करून परतणाऱ्या निहाल बागवानचा, त्याच्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि अकलूजकरांचाही जगातील सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेस कॅम्प 4 वरच निहालचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत अन्य 3 गिर्यारोहक होते त्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यापैकी एक पुण्याची तर एक दिल्लीची गिर्यारोहक युवती असल्याचे समजते. गुरुवारी शिखर सर केल्यावर निहालवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. सकाळी साडे सहा वाजता त्याने एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला होता. मात्र परत येत असतानाच त्यांच्याकडील ऑक्सिजन संपल्याचे समजते.
त्यामुळे ऑक्सिजन अभावी 4 जणांचा गुरुवारी सायंकाळी 8 च्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या गाईडकडून मिळाली आहे. निहालच्या मृत्यूची माहिती मिळताच माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिल्लीत फोन करून संबंधित यंत्रणेला तपासाची विनंती केली. अद्याप चार गिर्यारोहकांचा मृतदेह सापडला नसल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी त्याच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.