breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि ते..”; चंद्रकांत पाटलांच्या मानहानी वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई |

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर शिवसेनेने अग्रलेख लिहीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत पाटलांनी संजय राऊतांना पत्र पाठवलं होतं. त्या पत्रावरून पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप मान्य नाही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. आपण पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असून त्यांची तेवढीच किंमत आहे, असंही ते म्हणाले होते. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयाची नक्कीच नाही अशी मिश्किल टिप्पणी केली होती.

चंद्रकांत पाटील यांच्या टिप्पणी नंतर आता पुन्हा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “प्रश्न पैश्यांचा नाही तर स्वाभिमानाचा आहे. ५०० कोटींचा दावा ठोकू किंवा १००० कोटींचा ठोकू पण स्वाभिमानाची किंमत असते. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि आम्हाला त्यांचे पैसे नकोत. त्यांच्या पैशांवर आमचं घर चालत नाही. आम्ही सामान्य लोकं आहोत. आम्ही आमचे पैसे कमवतो आणि खातो हे त्यांनाही माहिती आहे. त्यांना सगळीकडे पैसेच दिसतात. त्यांचा पक्ष पैसेवाल्यांचा पक्ष आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

किंमत थोडी वाढवायला पाहिजे होती असे फडणवीसांनी म्हटल्याचे माध्यमांनी म्हटल्यावर संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “प्रश्न माझ्या किंवा त्यांच्या पैशाचा नाही. अब्रुची आणि स्वाभिमानाची किंमत होत नाही. तुम्ही खोटं बोललात तुमच्याकडे माहिती नाही. तुम्ही महाराष्ट्रासह सगळ्यांची बदनामी करत आहात. तुमचा तो राजकीय धंदा आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला कोर्टात खेचून जाब विचारावा लागेल. रुपया सव्वा कोटी हे आकडे फक्त दाखवायला असतात. पण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक शिवसैनिकाचा एक सन्मान आहे. त्यांच्यावर ते टीका करु शकत नाही. तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि ते कुठून आले आहेत ते आम्हाला माहिती आहे. योग्यवेळी ती बाहेर काढू,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • काय म्हणाले होते संजय राऊत?

“पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. असे घोटाळे केले असते तर मी इतक्या वर्षात राजकारणात राहिलो नसतो. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे,” अशी टीका राऊत यांनी केली. तसेच “भाजपाच्या नेत्यांच्या तोंडाची गटारं झाली असून ते तोंडात येईल ते बोलतात. देशात न्यायालयं नाहीत का, फक्त ईडीचीच कारवाई का होते. भाजपाच्या लोकांनी ईडीसारख्या संस्थांना बदनाम केलंय. ईडीचे यांच्या घरी भांडी घासायला येते का,” असा सवालही राऊतांनी केला.

  • चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर…

“हरकत नाही. कोणी १०० कोटी, कोणी १५० कोटी तसं हे सव्वा रुपया. फक्त ते माझे मित्र असल्याने मी त्यांना सुचवेन की थोडी अमाउंट वाढवावी लागेल. त्याचं कारण असं की, शेवटी मानहानीचा दावा म्हणजे काय? तर माझी एवढ्या रकमेची मानहानी झाली. संजय राउतांची मानहानी सव्वा रुपयाची नाही. त्यामुळे त्यांनी सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नक्कीच नाही. राजकारणात आम्ही एकमेकांना चिमटे काढतो, पण त्याची जखम होता कामा नये. त्यामुळे संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयाची नक्कीच नाही.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button