अडीच लाख मतांनी विजयी होणार : खासदार श्रीरंग बारणे यांचा विश्वास
मावळ लोकसभा निवडणूक रणसंग्राम : शहरातील पत्रकारांशी साधला संवाद
![Will win by two and a half lakh votes: Khasdar Srirang Barne believes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/श्रीरंग-बारणे--780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड: महायुतीच्या मित्र पक्षांनी मनापासून काम केले आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मला मताधिक्य मिळेल. मी शंभर टक्के विजयी होणार असून दोन लाख ५० हजार ३७४ मतांनी विजयी होईल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
खासदार बारणे यांनी आज (मंगळवारी) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मावळमध्ये महायुतीची ताकद होती, आहे आणि राहील. ‘उबाठा’ची कोठेही ताकद नाही. शेकापची उरण, पनवेलला ताकद आहे. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या सर्व आमदारांनी मनापासून काम केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार यांनीही काम केले आहे. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत, चिंचवड, पिंपरी आणि मावळ या सहाही विधानसभा मतदारसंघात मला मताधिक्य मिळेल. मी शंभर टक्के निवडून येणार आहे. दोन लाख ५० हजार ३७४ मतांनी मी विजयी होईल. मागील दोन्ही निवडणुकीत माझा अंदाज खरा ठरला आहे. बूथनिहाय अंदाज काढला आहे, याकडेही बारणे यांनी लक्ष वेधले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या 3 लाख 22 हजार 700 मतांपैकी मला 2 लाख 5 हजार 683 मते पडतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात 2 लाख 95 हजार 973 मतदान झाले. त्यापैकी 1 लाख 76 हजार मतदान मला पडेल. या दोन मतदारसंघांमध्ये मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही, असा दावा खासदार बारणे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचे आदेश मानले नाहीत. काही प्रमाणात काम केले नाही. बाकी सर्वांनी मनापासून काम केले. राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्त्यांनी काम केले असता तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले असते, असेही खासदार बारणे म्हणाले. आजपर्यंतच्या निवडणुकीत व्यक्तीगत आरोप कोणी केले नव्हते. पार्थ पवार, लक्ष्मण जगताप यांनीही व्यक्तीगत आरोप केले नव्हते. पण, संजोग वाघेरे यांच्याकडे विकासात्मक दृष्टी नव्हती. त्यामुळे वाघेरे यांनी व्यक्तीगत आरोप केले, याकडे बारणे यांनी लक्ष वेधले.