To The Point : डेप्युटी सीएम अजित पवार साहब को गुस्सा क्युँ आता है?
पिंपरी-चिंचवडच्या वर्चस्वासाठी दोन दादांमध्ये संघर्ष!
![Why is Deputy CM Ajit Pawar angry now?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/PCMC-2-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्चस्वावरुन राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दबंग नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजपाचे आमदार महेश लांडगे असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होऊ लागला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारत भूमिपूजनाच्या निमित्ता ही बाब अधोरेखित झाली.
‘‘2014 पासून पिंपरी-चिंचवडच्या विकासाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गती मिळाली किंबहुना महायुतीच्या सत्ताकाळात शहराचा विकास झाला’’ असा दावा थेट उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यासमोरच आमदार महेश लांडगे यांनी केला. त्यामुळे अजित पवारांनी भर भाषणात महेश लांडगे यांना ‘लक्ष्य’ केले. प्रसारमाध्यमांनी या विषयाला उचलून धरले आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी पोहोचली.
हेही वाचा : ‘अजिंक्य डी वाय पाटील’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच केली ग्राम स्वच्छता!
‘‘1992 पासून शहराचा कारभार मी पाहिला. शहराच्या विकासासाठी सर्वकाही केले. पण, महेशला माझे नाव घ्यायला काय वाईट वाटले मला माहिती नाही. पण, मनाचा मोठेपणा दाखवा…’’ अशा आशयाची टिपण्णी करीत अजित पवार यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. अजित पवार यांनी आपल्या स्वभावानुसार महेश लांडगे यांना ‘ऑन दी स्पॉट’ सुनावले. पण, दादांना एव्हढा गुस्सा येण्याचे कारण काय? अशी चर्चा यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात जोर धरु लागली आहे.
जगताप- लांडगेंनी पवारांचे वर्चस्व झुगारुन लावले..
वास्तविक, 1992 पासून अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींमध्ये निर्णायक हस्तक्षेप राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून 1999 पासून 2017 पर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राहिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार म्हणून अजित पवार यांचा लौकीक महाराष्ट्रभरात करण्यात आला. मात्र, 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार केले. जगताप- लांडगे यांनी अजित पवारांचा बालेकिल्ला ढासळला. त्याची सल आजही पवारांच्या मनात आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता..
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मोठी महानगरपालिका पिंपरी-चिंचवडमधून अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरूंग लागला. 2019 च्या निवडणुकीत सर्व तीन मतदार संघात पक्ष पिछाडीवर राहिला. चिंचवड आणि भोसरी उमेदवारच देता आला नाही. 2022 मध्ये चिंचवडच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवार पराभूत झाला. 2024 मध्ये पिंपरीत महायुतीमुळे घड्याळाची टिकटिक राहीली. भोसरीतील सहकारी ऐनवेळी शरद पवार गटात गेले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर पिंपरी-चिंचवडचे स्थानिक नेतृत्त्व म्हणून आमदार महेश लांडगे यांची ओळख निर्माण झाली. खासदार बारणे दिल्लीत आणि महेश लांडगे राज्यात शहराचे नेतृत्त्व करु लागले. यामुळे अजित पवार आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.