breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या ‘त्या’ १९ बंगल्यांचं काय आहे वास्तव? कोर्लाईच्या सरपंचांनीच केला खुलासा!

मुंबई |

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रायगडमधल्या १९ बंगल्यांवरून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. या मुद्द्यावरून मंगळवारी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत या आरोपांबाबत उत्तर दिलं होतं. या ठिकाणी कोणतेही बंगले नसल्याचं राऊत म्हणाले होते. यासंदर्भात नेमकं वास्तव काय? याची चर्चा सुरू झालेली असताना खुद्द कोर्लाई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर खुलासा केला आहे.

  • प्रत्यक्षात १८च बंगले!

सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादग्रस्त जमिनीवर प्रत्यक्षात १८च घरं होती. “२००९ला अन्वय नाईक यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून ही घरं घेतली होती. त्यांना रिसॉर्ट तयार करायचं होतं. त्यानंतर सीआरझेडची परवानगी न मिळाल्यामुळे त्यांनी तो प्लॅन रद्द केला. त्यानंतर त्यांनी त्या जागेची लेव्हलिंग करून तिथे झाडं लावली”, अशी माहिती मिसाळ यांनी दिली आहे.

  • घरं पाडल्यानंतरही घरपट्टी सुरूच

दरम्यान, अन्वय नाईक यांनी ही घरं पाडल्यानंतर देखील २०१४पर्यंत तिथल्या १८ घरांची घरपट्टी चालू स्थितीतच राहिली. २०१४पर्यंत अन्वय नाईक यांनी घरपट्टी भरली आहे. २०१४ला मनीषा वायकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी ती जागा विकत घेतली. मात्र, २०१९ला अर्ज करून त्यांनी संबंधित जागेची मालकी त्या दोघींच्या नावावर केली. आजच्या स्थितीत २०२१मध्ये तिथे एकही घर नसल्यामुळे आम्ही ती घरं कागदोपत्री रद्द केली आहेत”, असं मिसाळ म्हणाले.

  • रश्मी ठाकरेंचा माफीनामा?

दरम्यान, रश्मी उद्धव ठाकरेंचा कोणताही माफीनामा आजपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध झालेला नसल्याचं सरपंचांनी स्पष्ट केलं. “ठाकरे कुटुंबापैकी कुणीही आजपर्यंत आमच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी कधीही ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केलेला नाही. जे काही आहे, ते आम्ही रीतसर केलं आहे. २०२१पर्यंत रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी घरपट्टी भरलेली आहे. हा व्यवहार झाला, तेव्हा ही घरं प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हती. फक्त कागदावर होती. साधारण ३ ते साडेतीन हजार चौरस फुटांची घरपट्टी होती. आम्ही त्यांना त्यासंदर्भात पत्र लिहिली होती. त्यानंतर त्यांनी घरपट्टी भरली. मात्र नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथे घरं अस्तित्वात नाहीत. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून घरपट्टी रद्द केली”, असं मिसाळ म्हणाले.

  • मूळ जमीन ख्रिश्चन समाजाची

संबंधित वादग्रस्त जमीन ही मूळ ख्रिश्चन समाजाची असून त्यांच्याकडून अन्वय नाईक यांनी ती विकत घेतल्याचं सरपंच मिसाळ म्हणाले. “२००९ ला ती जमीन अन्वय नाईक यांनी विकत घेतली होती. २०१४ला त्यांनी ती वायकर आणि ठाकरे यांच्या नावावर केली. अन्वय नाईक यांनी जमीन विकली तेव्हा तिथे कुठलीच घरं नव्हती”, असं स्पष्टीकरण मिसाळ यांनी दिलं आहे. आता मिसाळ यांच्या या खुलाशानंतर पुन्हा एकदा या मुद्द्यावरून दावे-प्रतिदावे रंगण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button