breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल… एकनाथ शिंदेंची फर्माईश, बापूंनी पुन्हा डायलॉग सुनवला!

गुवाहाटी : शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…” या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. रांगडी माणदेशी भाषा, त्यातील ओलावा आणि शहरी वातावरणाचा अनुभव शहाजीबापूंनी परफेक्ट मांडला असल्याची भावना नेटकऱ्यांची आहे. सध्या प्रत्येकाच्या व्हॉट्स अॅप स्टेटसला त्यांच्या मनातील भावना आणि आपल्या स्वत:चा फोटो, हेच पाहायला मिळत आहे. पावसाने ओढ दिलीये पण बापूंच्या मिम्सचा जोरात पाऊस पडतोय. बापूंच्या याच डायलॉगची गुवाहाटीमधील आमदारांना देखील भुरळ पडलीये. एकनाथ शिंदे यांनीच शहाजीबापूंना ‘त्या’ डायलॉगची फर्माईश केली… झालं तर मग… बापूंनी देखील “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…” हा डायलॉग ऐकवला. त्यावर उपस्थित आमदारांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला आणि टाळ्यांचा कडकडाट देखील झाला.

एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदार महोदयांना बापूंच्या डायलॉगची भुरळ पडलीये. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंचं मनापासून कौतुक केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बापूंना त्यांचा सुपरहिट डायलॉग पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची फर्माईश केली. तसेच हा डायलॉग किती व्हायरल झालाय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हे देखील दाखवून दिलं. एकनाथ शिंदे यांनी फर्माईश केल्यानंतर बापू काहीसे लाजले पण उपस्थित आमदारांनी डायलॉग म्हणण्याला पाठिंबा दिला अन् बापूंनी देखील बहुमताचा रेटा असल्याने पुन्हा “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…” हा ट्रेडिंग डायलॉग म्हटला. उपस्थित सगळ्या आमदारांनी बापूंच्या डायलॉगला एकमताने दाद दिली, बापूंचं तोंडभरुन कौतुक केलं…!

  • ऑडियो क्लिपनंतर शहाजी बापू पाटील यांचा नवा व्हिडीओ…

व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर बापू तीन दिवस माध्यमांशी एकही शब्द बोलले नाही. आज त्यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला. आमचा महाविकास आघाडीला विरोध आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत, असं शहाजी बापू पाटील व्हिडीओमधून सांगत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी गुवाहाटीत आपण का गेलो, याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला. महाविकास आघाडीला आमचा विरोध आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही, असं स्पष्ट करताना याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये अशी विनंतीही शहाजी बापू पाटलांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button