लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान, एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांचा अर्ज
![Voting for the post of Lok Sabha Speaker today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Om-Birla-and-K-Suresh-780x470.jpg)
नवी दिल्ली | अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन सुरू आहे. विरोधकांना लोकसभेचे उपाध्यक्ष पद न दिल्यामुळे इंडिया आघाडीने अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा दिवस असून अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते. पंतप्रधान मोदी सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडतील. त्यानंतर १९७६ नंतर पहिल्यांदाच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून केरळमधील काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी अर्ज दाखल केला आहे.
एनडीएकडे किती संख्याबळ?
एनडीएकडे २९३ खासदारांचे संख्याबळ आहे. तसेच आंध्रप्रदेशच्या जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या चार खासदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. ओडिशामध्ये भाजपाने बिजू जनता दलाचा पराभव केल्यानंतर त्यांनी भाजपाला कोणताही पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, मराठमोळा तुषार देशपांडेही भारतीय संघात
याशिवाय अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल, नगिनाचे खासदार चंद्रशेखर आझाद, शिलाँगचे खासदार रिकी अँड्रू यांचाही पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे. या निवडणुकीत जवळपास ३०० खासदारांचा पाठिंबा मिळवून विरोधकांवर एकप्रकारचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एनडीएकडून केला जात असल्याचे दिसत आहे.
इंडिया आघाडीचे संख्याबळ किती?
अध्यक्षपदाचा विजय हा किती खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान केले, यावर ठरणार आहे. याचा अर्थ या सात खासदारांनी शपथ न घेतल्यामुळे विरोधकांचे संख्याबळ आताच कमी झाले आहे. विरोधकांनी २३२ जागांवर विजय मिळविला आहे. त्यापैकी पाच खासदारांनी शपथ न घेतल्यामुळे हे संख्याबळ सध्या २२७ इतके आहे. अनेक खासदारांनी शपथ न घेतल्यामुळे बहुमताची संख्या २६९ एवढी झाली आहे.