‘नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल’; काँग्रेसचा आरोप
मुंबई : मोदी सरकारच्या सात पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. यानंतर विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – ‘राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक’; आदित्य ठाकरेंची खोचक टीका
नितीन गडकरींविषयी सगळे सांगतात की, स्वच्छ प्रतिमा वगैरे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचं राजकारण संपवायचं हेही एक कारण असू शकतं, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
कॅगमध्ये भ्रष्टाचार समोर आला आहे. रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे या कॅग अहवालावर त्यांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा अहवाल समोर आल्यावर आता केंद्र सरकार काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.