उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते, भाजपने नकार दिला, संजय राऊत यांचा दावा
संजय राऊत यांनी केला नवा राजकीय गौप्यस्फोट
![Uddhav Thackeray, Eknath Shinden, Chief Minister, BJP, Denied, Sanjay Raut's Claim, New Political, Confidential Blast,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Sanjay-Raut-Eknath-shinde-udhav-thakre-780x470.png)
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे खुद्द उद्धव ठाकरेही या प्रकरणी आजपर्यंत काहीही बोललेले नाहीत. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, असे उद्धव ठाकरे अनेकदा बोलले आहेत. त्यांना दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचे होते. मात्र, आपण कोणाला मुख्यमंत्री करणार आहोत, हे उद्धव ठाकरेंनी कधीच स्पष्ट केले नाही. राऊत यांनीही आता तसा खुलासा केला आहे. राऊत यांच्या दाव्यानुसार 2019 मध्ये अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव आला तेव्हा भाजपने शिवसेनेला विचारले की, तुमचा मुख्यमंत्री कोण होणार? त्यावर एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख होता. यानंतर भाजपने युती तोडल्याचा राऊत यांचा दावा आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपच्या विरोधामुळे 2019 मध्ये युती तुटली, असे उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत कधीही म्हटले नाही. अशी वेगळी माहिती देत संजय राऊत यांनी नवा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊत पुन्हा इथेच थांबले.शिवसेनेला जेव्हा महाविकास आघाडीत मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तेव्हा उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचे होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, आमचे अनेक ज्येष्ठ नेते सरकारमध्ये मंत्री होणार आहेत. एकनाथ शिंदे अजूनही कनिष्ठ आहेत. त्यामुळे हे नेते त्यांच्या हाताखाली काम करू शकणार नाहीत. त्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्री व्हा, असे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सूचवले.
शरद पवारांच्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार स्पष्टीकरण दिले आहे. मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, असेही ठाकरे म्हणाले आहेत. यासोबतच भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे आश्वासनही पूर्ण केले नाही. त्यामुळेच शिवसेना-भाजप युती तुटल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. 2019 मध्ये भाजपने अडीच वर्षांच्या पदाचा फॉर्म्युला स्वीकारला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले असते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.