‘काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि..’; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना खोचक टोला
पुणेकरांना दुषित पाण्यातून रोग होत आहेत, जबाबदार कोण? उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन कार्य अहवालाचं विमोचन केलं. शिवबंधन अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, की माझ्या हातात काहीही नाही तरीही आपली शिवसेना खरी आहे. आपल्याला शिवसेना प्रमुख म्हणाले होते ते आपल्याला करायचं आहे. नोकऱ्या मागणारे होऊ नका नोकऱ्या देणारे व्हा. पदं मागणारे होऊ नका, पदं देणारे व्हा. यांचं आयुष्य जे मिंध्याचं अरे काजवाही एवढासा असला तरीही स्वयंप्रकाशित असतो, हे स्वयंप्रकाशित कुठे? यांच्यावर तिकडून टॉर्च मारत आहेत तोपर्यंत हे दिसत आहेत. दिल्लीतला टॉर्च बंद झाला की अंधारात हे कुठे जातील? त्यानंतर त्यांच्याबरोबर जे गेले आहेत त्या काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणार नाही. यांचं भवितव्य बिकट आहे.
हेही वाचा : अनधिकृत आरओ प्लांट्स बंद करण्याचे महापालिकेचे आदेश!
पुण्यात जीबीएस नावाचा रोग पसरतो आहे. तो रोग दुषित पाण्यामुळे पसरतो आहे. उत्तर द्यायला महापालिका कुठे आहे? ती विसर्जित झाली आहे. भाजपाकडेच पुणे महापालिका होती. जा मग नगरविकास खात्यात जे धेंड बसवलं आहे ना त्याला विचारा. काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस, पुणेकरांना दुषित पाण्यातून रोग होत आहेत, जबाबदार कोण? मंत्री असणार, दुसरा कोण? आम्हाला काही मिळालं तर आम्ही खुश नाहीतर आम्ही रुसूबाई रुसू, पण जनता शांत आहे, जनता पेटली तर तुमच्या घरात घुसू हेच म्हणेल, असं एकनाथ शिंदेंना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले.
जो काही कारभार सध्या चालला आहे त्याला उत्तर द्यायचं असेल तर हातात भगवा आणि शिवबंधन हवं. कार्य अहवाल करणारा हा शिवसेना एकमेव पक्ष आहे. हे लोक मुंबईचा सत्यानास करत आहेत. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे या राजधानीला भिकेचे डोहाळे लावले या लोकांनी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारीचा शिक्का पुसला जात नाही : उद्धव ठाकरे
निवडणुकीत हार-जीत होत असते. पण आपली हार झालेली नाही. कारण लोकांच्या मनात आजही आपण आहोत. मी गद्दारांना सांगू इच्छितो तुम्हाला तानाजी मालुसरे होता आलं नाही शिवाजी महाराज तर सोडूनच द्या. बाजीप्रभू देशपांडे होता आलं नाही. पण तुम्ही खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ झालात कारण ते होणं सोपं असतं. ही दोन्ही घेतली तरीही गद्दारच म्हणतो, यांना चारशे वर्षे झाली तरीही त्यांचा गद्दारीचा शिक्का पुसला जात नाही, यांचा गद्दारीचा शिक्का कधी पुसला जाणार? असंही उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.