‘अजित पवार मोठा माणूस आहे’; उदयनराजेंची मिश्किल टीका
![Udayanraje Bhosle said that Ajit Pawar is a big man](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/ajit-pawar-and-udayanraje-bhosale-780x470.jpg)
अजित पवार हे भविष्य जाणणारे आहेत का?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते की, भाजपाकडून कसबा मतदारसंघात कोणताही नेता आला तरी रविंद्र धंगेकर यांचाच विजय निश्चित आहे. यावरून आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मिश्किल टीका केली आहे. ते हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ कसबा विधानसभा मतदारसंघात आले होते.
कोणत्याही परिस्थितीत हेमंत रासने हेच निवडूण येणार आहेत. अजित पवार मोठा माणूस आहे. म्हणून म्हणतात कोणीही येऊ द्या, आम्हाला फरक पडणार नाही. अजित पवार हे भविष्य जाणणारे आहेत का? मला माहित नाही. ते भविष्याचा विचार करतात. मी वर्तमानमध्ये जगणारा माणूस आहे . लोकशाहीत लोक राजे असतात. त्यामुळे लोकांनी ठरवलेला आहे. हेमंत रासने निवडून येतील असा विश्वास आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. त्याबद्दल त्यांना आदरांजली देतो आणि ताईंची राहिलेली उर्वरित कामे हेमंत रासने हे करणार आहेत. या निवडणुकीत हेमंत रासने यांना मतदार राजाकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.