breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘समृद्धी’ महामार्गावर २ मेपासून प्रवास?; पहिल्या टप्प्यात इथपर्यंत मार्ग होणार खुला!

  • पहिल्या टप्प्यात नागपूर ते सेलू बाजार असा २१० किमीचा मार्ग खुला

मुंबई |

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे २ मे रोजी उद्घाटन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयारी सुरू केली आहे. नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार असा २१० किलोमीटरचा मार्ग पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे.

समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डीदरम्यान पहिल्या टप्प्यात वाहतूक सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा विचार सुरू होता. मात्र पॅकेज ५ मधील कंत्राटदार आर्थिक अडचणीत आल्याने तेथील काम रखडले. त्यामुळे या टप्प्यातील कंत्राटदार बदलण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर आली. तर विविध कारणांमुळे पॅकेज ७ मधील काही पुलांचे काम रखडले आहे. तसेच करोनाच्या दुसऱ्या लाटेत कुशल कर्मचारी वर्ग गावी गेल्याने, तसेच ऑक्सिजनचा पुरवठा बाधित झाल्याने अभियांत्रिकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामे करण्यात बाधा आली. पॅकेज ११ मध्ये कोपरगावमधील गोदावरी नदीवरील पुलाचे काम पाण्याच्या प्रवाहामुळे करण्यात अडचणी येत आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर उजाडण्याची शक्यता आहे.

दरम्यान पहिल्या टप्प्यात ५२० किलोमीटरपैकी ३६० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा विचार होता. यातील नागपूर ते सेलू बाजार हा २१० किलोमीटरचा रस्ता आणि सिंदखेराजा ते वैजापूर १५० किलोमीटर रस्ता सुरू होणार होता. मात्र यात सेलू बाजारनंतर १२० किलोमीटर अंतर बाह्य रस्त्याने पार करून वाहनांना पुन्हा सिंदखेराजा ते वैजापूर प्रवास समृद्धी महामार्गावरून करावा लागला असता. तसेच मधल्या टप्प्यातही काही पुलांची कामे अद्याप पूर्ण नसल्याने वाहनांना आणखी काही ठिकाणी बाह्य रस्त्यांवरून प्रवास करावा लागण्याची चिन्हे होती. परिणामी पहिल्या टप्प्यात नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजारपर्यंतचा २१० किमी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने डिसेंबरअखेरपर्यंत नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महामार्गाची लांबी – ७०१ किलोमीटर.

  • खर्च – ५५ हजार कोटी.
  • मार्गिका – ३+३.
  • शहरांना जोडण्यासाठी प्रस्तावित इंटरचेंज – २४.
  • कोठून जाणार – १० जिल्हे, २६ तालुके, ३९२ गावे.
  • रस्त्याची निर्मिती – १५० किमी प्रतितास वाहने चालू शकतील
  • सुरुवातीला वाहन वेगमर्यादा – १२० किमी प्रतितास
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button