To The Point : तब्बल ४० नगरसेवकांची ताकद पाठिशी, तरीही अजित गव्हाणे का हरले?
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील कथित चाणक्याने चांगले नेतृत्व अडचणीत आणले!
मतदार संघात विकासाचे मुद्दे सोडून राजकीय टिका-टीपण्णीला मतदारांनी सपशेल नाकारले!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
‘‘योद्धा कितीही निपुण असला, तरी सल्लागार चुकला, तर विजय दुरापास्त’’ हा अलिखीत नियम आहे. तब्बल ४० माजी नगरसेवक आणि माजी आमदार विलास लांडे, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, रवि लांडगे यांच्यासारखे मातब्बर नेते तसेच २० वर्षे नगरसेवकपदाचा अनुभव गाठीशी असतानाही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा सुमारे ६४ हजार मतांनी पराभव झाला आहे. शहराच्या राजकारणात स्वत:ला ‘चाणक्य’ समजणाऱ्या अनावश्यक सल्लागारामुळे उच्चशिक्षीत नेतृत्व अक्षरश: अडचणीत आले.
विधानसभा निवडणूक पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकाणातील निर्णायक ठरली. या निवडणुकीत शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदार संघातून महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हद्दपार झाली. तिनही जागांवर महायुतीने विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.
भोसरी मतदार संघात निवडणूक अत्यंत चुरशीची होणार? किंबहुना, आमदार महेश लांडगे यांची ‘सीट’ धोक्यात येईल? असा दावा केला जात होता. कारण, महाविकास आघाडीतील इच्छुक अजित गव्हाणे, सुलभा उबाळे आणि रवि लांडगे या मंडळींनी मोठा उठाव केला होता. त्यातच अजित गव्हाणे यांच्यासोबत ४० माजी नगरसेवकांची फौज, गावगाडा आणि दस्तुरखुद्द त्यांचे गुरूवर्य माजी आमदार विलास लांडे होते. मात्र, अत्यंत आव्हानात्मक निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी चक्रव्युव्ह भेदले आणि विजयश्री खेचून आणली.
भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण ६१.१४ टक्के मतदान झाले. एकूण ६ लाख ८ हजार ४२५ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख २८ हजार २८० पुरुष तर २ लाख ८ हजार ४८ महिला तर अन्य ९७ मतदार आहेत. या निवडणुकीत एकूण ३ लाख ७५ हजार ४०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार महेश लांडगे यांना २ लाख १३ हजार ६२४ मते मिळाली आहेत, तर अजित गव्हाणे यांना १ लाख ४९ हजार ८५९ मते आहेत. तब्बल ६३ हजार ७६५ मताधिक्याने महेश लांडगे विजयी झाले आहेत.
1. बेछुट आरोप करा…हा सल्ला चुकला!
‘‘विकासकामांच्या मुद्यांवर महेश लांडगे यांची बरोबरी करता येत नाही. त्यामुळे बेछुट आरोप करा. भ्रष्टाचार, दहशत, दडपशाही असे विविध शब्दप्रयोग करा…’’ असा सल्लाच अजित गव्हाणे यांना देण्यात आला. त्यांनी त्यानुसार सोशल मीडिया आणि सभा-बैठकांमध्ये आरोपांची राळ उठवली. ‘भोसरीत राहण्याची लाज वाटते’… हा आरोप भोसरीकरांना आवडला नाही. मात्र, विकासाच्या मुद्यांवर बोलण्याकडे दुर्लक्ष केले. एकही आरोप सिद्ध करून दाखवता आला नाही. संतपीठ, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, अर्बन स्ट्रिट, चिखली घरकूल अशा मुद्यांवर केलेल्या आरोपांची हवा आमदार महेश लांडगे यांनी जाहीर सभेत काढून घेतली. त्याला प्रत्त्यूत्तरही देता आले नाही. टीम गव्हाणे आणि महाविकास आघाडीने विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढवणे अपेक्षीत होते. पण, गव्हाणे यांच्या प्रतिमेला साजेसे ‘ब्रँडिंग’ झाले नाही. त्यामुळे गव्हाणे यांची सुशिक्षित आणि शांत-संयमी ही चांगली प्रतिमा या निवडणुकीत शेवटपर्यंत राहिली नाही.
2. अजित गव्हाणे यांना ‘व्हीजन’ मांडता आले नाही…
‘‘भोसरीत बकालपणा वाढला आहे. पिंपरी आणि चिंचवडच्या तुलनेत विकास झाला नाही’’ असा आरोप अजित गव्हाणे यांनी सातत्त्याने केला. मात्र, कथित बकालपणा दूर करण्यासाठी मी काय करणार आहे..? माझे व्हीजन काय? हे त्यांना सांगता आले नाही. सोसायटीधाकरांच्या समस्यांबाबत त्यांनी आवाज उठवला.. मी माझ्या प्रभागात सोसायटीधारकांसाठी काय केले? हे सांगता आले नाही. स्थायी समिती सभापती असताना समाविष्ट गावांसाठी मी काय केले? यापुढे मी काय करणार आहे? याचे व्हीजन गव्हाणे यांना मांडता आले नाही. गव्हाणे यांनी जाहीर केलेला वचननामा अत्यंत कुचकामी होता. एव्हढ्या अभ्यासू नेत्याने मतदारांना काहीतरी ‘युनिक’ आणि नवीन दूरदृष्टी दाखवणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही.
3. सोशल मीडियाचा नकारात्मक वापर…
सोशल मीडियासाठी टीम गव्हाणे यांनी पुणे-मुंबईतील मोठी टीम कार्यान्वयीत केली होती. त्याद्वारे महेश लांडगे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका-टीपण्णी करण्यात आली. वास्तविक, गव्हाणे यांचा स्वभाव आणि त्यांची कार्यपद्धती लोकांना आवडली नाही. याउलट, महेश लांडगे आणि टीमने सोशल मीडियावर केलेल्या कामांचा आणि भविष्यात काय करणार आहे..? या व्हीजनचा ओहापोह केला. महेश लांडगे यांचा भ्रष्टाचार, दहशत आणि बदनामी यावर गव्हाणेंच्या टीमने ‘फोकस’ केला. मोशी येथील श्री नागरेश्वर महाराज मंदिरासमोर ठोकलेला शड्डू सारख्या विषयावर वेळ आणि श्रमही वाया गेले. दुसरीकडे, विविध परिसरात ‘मॅनेज’ केलेल्या ‘बाईट’मुळे मतदार आपला निर्णय ठरवतील, असा शोध लावणेही महागात पडले. सोशल मीडियाचा नकारात्मक वापर करणे… हा केवळ ‘बचपणा’ ठरला. सोशल मीडियाची ‘पेड’ यंत्रणा अपेक्षीत ‘रिझल्ट’ देवू शकली नाही.
4. नेत्यांची गर्दी, यंत्रणा सपशेल फेल…
गव्हाणे यांच्याकडे माजी नगरसेवक आणि नेत्यांची गर्दी होती. माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर हनुमंत भोसले अशा दिग्गजांसोबत ४० नगरसेवकांची फौज अजित गव्हाणे यांच्यासोबत होती. मात्र, बूथ व्यवस्थापन आणि मतदान करुन घेण्याची यंत्रणा सक्षम नव्हती. टीम महेश लांडगे यांनी एक-एक मत जमा केले. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ‘लक्ष्मीदर्शन’ मुद्यावर वातावरण तापले. गव्हाणे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. मात्र, चार-पाच घटनांमध्ये गव्हाणे समर्थकच पैसे वाटप करताना रंगेहात सापडले. त्यामुळे या मुद्यावर गव्हाणे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा मॅसेज तळागाळात गेला. ‘‘तळवडे, मोशी, नेहरुनगर आणि चिखली या चार भागातील स्थानिक शिलेदारांनी उठायचे आणि आमदारांवर आरोप करायचे…’’ ही ‘स्ट्रॅटजी’ अरक्षश: ‘फेल’ ठरली. कारण, ही निवडणूक अजित गव्हाणे यांना लढायची होती.
5. शरद पवार, अमोल कोल्हेंच्या भरोसे लढण्याची चूक…
विधानसभा निवडणूक पक्षाच्या नेत्यांच्या भरोशावर लढण्याचे दिवस आता संपले आहेत. मात्र, गव्हाणे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा निर्णायक होईल. यासाठी सर्व ताकद लावली. पण, सभेत शरद पवार यांनी महेश लांडगेंचा टीका सोडा, उल्लेखही केला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे मनोबल खचले. दुसरीकडे, खासदार अमोल कोल्हे यांनी बेसुमार आरोप केले. उच्चशिक्षीत कोल्हे निराधार आरोप करीत असताना, भ्रष्टाचाराचा दावा करीत असताना एकाही मुद्यावर पुरावा देता आला नाही. हा मुद्दा अजित गव्हाणे यांच्यावर ‘बुमरँग’ झाला. नेत्यांच्या करिष्म्यावर अवलंबून राहिल्यामुळे गव्हाणे यांचा निवडणुकीत प्रभाव दिसला नाही. भोसरीकरांनी वज्रमूठ बांधली आणि गव्हाणे यांना ‘होमपिच’वरसुद्धा पिछाडीवर रहावे लागले.
6. हिंदूव्यतिरिक्त मतांचे धृवीकरण अपयशी प्रयत्न…
निवडणुकीच्या सुरूवातीच्या टप्प्यातच मतदार संघातील मुस्लिम संघटनांचा अजित गव्हाणे यांनी पाठिंबा घेतला आणि महेश लांडगे यांना ‘हिंदुत्व कार्ड’ बाहेर काढण्याची संधी दिली. लांडगे यांच्या टीमने या मुद्याचा पुरेपुर फायदा घेतला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा यशस्वी केली. यावर खासदार डॉ. कोल्हे यांनी थेट टीका केली आणि ‘‘उत्तरभारतीय पोट भरायला महाराष्ट्रात येतात’’ असे वक्तव्य केले. त्यामुळे अमराठी मतदारांनी सर्व ताकद लांडगे यांच्या पाठिशी उभा केली. चिखली येथील सभेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘फतवा विरुद्ध भगवा’ सूत्र पटवून सांगितले. संविधान भवनाच्या जाहीरातीवरील कथित स्वाक्षरी, हिंदू व्यतिरिक्त मतांचे धृवीकरण करण्याचा गव्हाणे यांनी पूर्णत: प्रयत्न केला. ‘हिंदुत्वाचा मुद्दा’ आपल्या अंगलट येणार, असे चित्र निर्माण झाले. त्यावेळी गव्हाणे यांनी ‘‘मीसुद्धा हिंदू आहे…’’ असे जाहीर केले. तोपर्यंत हिंदू समाजाने आपले ‘मत’ ठरवले होते.
20 ते 25 हजारांच्या फरकाने का असेना, निवडणूक जिंकू… असा आत्मविश्वास टीम गव्हाणे यांना होता. मात्र, केवळ सल्लागार चुकल्यामुळे अजित गव्हाणे यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याला अपयशी ठरावे लागले. यातून गव्हाणे यांनी आत्मचिंतन करावे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
(उद्या वाचा… कोणत्या प्रभागात किती मतदान झाले? राजकीय विश्लेषण)




