To The Point : भाजपातील नाराजांचे ‘इनकमिंग’ ही महाविकास आघाडीची सूज!
पिंपरी-चिंचवडमधील महाविकास आघाडी ‘नाराजांच्या भरोसे’
![To The Point: The 'incoming' of the disgruntled in the BJP is the swelling of the Mahavikas Aghadi!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/To-The-Point-The-incoming-of-the-disgruntled-in-the-BJP-is-the-swelling-of-the-Mahavikas-Aghadi-780x470.jpg)
विकासकामांच्या मुद्यांऐवजी निव्वळ आरोप-प्रत्यारोपांवर भर!
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. शहरात आता मातब्बर नेत्यांच्या सभा-बैठका सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये शहराच्या ‘व्हीजन’ बाबत किंवा मी काय केले? काय करणार आहे? या ऐवजी महाविकास आघाडीचे नेते आणि उमेदवार भाजपामधून आपल्यासोबत किती आले? आणि त्याचा राजकीय फायदा कसा होणार? अशा विषयांमध्ये मश्गुल आहेत. मात्र, भाजपामधील नाराजांचे ‘‘इनकमिंग’’ ही महाविकास आघाडीची सूज आहे. निवडणुकीत याचा फारसा फायदा होणार नाही, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप झाले. तत्पूर्वी, काही इच्छुक उमेदवारांनी तिकीटाच्या हिशोबाने महाविकास आघाडीत प्रवेश केला. त्यामध्ये भोसरीतून अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवक रवि लांडगे यांचा उल्लेख केला जातो. गव्हाणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि लांडगे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचा झेंडा हातात घेतला. यापूर्वी, गव्हाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आणि महायुती म्हणून सत्ताधारी पक्षाचे नेते होते. रवि लांडगे भाजपाच्या तिकीटावर बिनविरोध नगरसेवक झाले होते.
चिंचवड आणि पिंपरीची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. पिंपरीतून तीव्र इच्छुक असलेल्या माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे भाजपाच्या तिकीटावर नगरसेवक झाल्या होत्या. चिंचवडमधून चंद्रकांत नखाते यांनाही भाजपामुळेच सभागृहात जाण्याची संधी मिळाली होती. हे दोन्ही नेते विधानसभेकरिता तीव्र इच्छुक होते. मविआ आणि महायुती दोन्ही बाजुला प्रचंड फिल्डिंग लावूनही त्यांना संधी मिळाली नाही. आजच्या घडीला हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे. कारण, नखाते यांनी नुकतेच भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
‘‘अजित गव्हाणे यांनी माझ्यासोबत ४० नगरसेवक आहेत’’ असा दावा केला. हा त्यांच्या उमेदवारीचा ‘प्लस पॉईंट’ ठरला. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंचवडमधून राहुल कलाटे यांच्यासाठी पक्षश्रेष्ठींचे मन वळवले. पिंपरीत निष्ठावंत म्हणून सुलक्षणा शिलवंत यांच्या उमेदवारीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘क्लेम’ कायम ठेवला. त्यामुळे संपूर्ण शहर ‘तुतारी’मय झाले आणि ‘मशाल’ केवळ वातावरण निर्मितीसाठी राहिली, हे सर्वश्रृत आहे.
महाविकास आघाडीत भोसरी आणि चिंचवडच्या तिकीटावरुन राजकीय खलबते झाली. त्यामध्ये पिंपरीच्या जागेचा निर्णय घेणे पक्षश्रेष्ठींना अडचणीचे झाले. घमासान चर्चा करुन महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला शहरातील तीनही जागा घेण्यात आला. त्यामुळे शिवसेनेला मानणारा निष्ठावंत शिवसैनिक आजही नाराज आहे. महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर नेते एकत्र दिसतात. मात्र, ठाकरे गट आणि काँग्रेसचा कार्यकर्ता शोधून सापडत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
संकटात ज्यांनी पाठ फिरवली..त्यांना काखेत घेतले… ही चूक…
विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मनोबल खचवण्यासाठी भाजपातून क्रमाक्रमाने माजी नगरसेवकांचा प्रवेश करुन घ्यायचा आणि त्यांचे प्रसारमाध्यमांधून ‘पॉलिटिकल मायलेज’ मिळवायचे, अशी महाविकास आघाडीची रणनिती दिसते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून तसा ‘नॅरेटिव्ह’ नियोजनबद्ध ‘सेट’ केला जात आहे. आतापर्यंत १३ नगरसेवकांनी भाजपाची साथ सोडली. यामध्ये माजी शहराध्यक्ष तथा माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यापासून अगदी सारिका लांडगे यांच्यापर्यंत प्रत्येकाने एकतर राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा स्थानिक नेतृत्त्वावर नाराजी या मुद्यावर भाजपाला सोडचिठ्ठी दिली. यातील तीन-चार माजी नगरसेवक वगळता त्यांच्या प्रभागक्षेत्रात त्यांचा किती प्रभाव आहे? हा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे. यातील अनेक नगरसेवक एक तर भाजपाच्या चिन्हामुळे किंवा स्थानिक नेतृत्वाच्या मदतीने मग चिंचवडमध्ये स्व. लक्ष्मण जगताप आणि भोसरीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या मदतीमुळे निवडून आले होते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. दुसरीकडे, भाजपातील घाऊक घुसखोरीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात सर्व अलबेल आहे, असे चित्र नाही. शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा असलेली मंडळी ‘‘ पक्ष संकटात ज्यांनी पाठ फिरवली होती. त्यांनाच पुन्हा काखेत घेतले. तिकीट दिले, ही पक्षश्रेष्ठींची चूक झाली.’’ अशी खंत व्यक्त करतात. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
लोकसभा निवडणुकीचा निकाल काय सांगतो?
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. अनेक मातब्बर नेते, आमदारांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची साथ सोडली. सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ३५-४० आमदार सोडून गेल्यानंतरही ठाकरे आणि पवार गटाचा ‘स्ट्राईक रेट’ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा मजबूत राहीला. शिरुर लोकसभा मतदार संघातून एकही आमदार सोबत नसताना डॉ. अमोल कोल्हे यांनी आणि मावळातून मोजक्या सहकाऱ्यांच्या साथीने महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. याचा अर्थ उमेदवाराच्या पाठीमागे किती नगरसेवक आणि किती नेते आहेत. या पेक्षा उमेदवार किती सक्षम आहे? याला महत्त्व आहे. २०२२ पासून महानगरपालिकेत प्रशासकीय सत्ता सुरू झाली. त्यामुळे माजी नगरसेवकांचा जनसंपर्क पूर्णत: कमी झाला. त्यामुळे भाजपातील नाराज माजी नगरसेवकांची फौज सोबत घेणे म्हणजे बाजारबुणग्यांच्या आधारे युद्ध जिंकण्याचे स्वप्न पाहिल्यासारखे आहे, ही बाब महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. याउलट, पिंपरी-चिंचवडकरांसाठी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात काय दिले..? किती प्रलंबित प्रश्न सोडवले…? आणि भविष्यकाळातील ‘व्हीजन’ काय यावर नेत्यांनी बोलावे, अशी अपेक्षा पिंपरी-चिंचवडकरांमधून व्यक्त होते आहे.