To The Point: ‘‘स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर हाच भाजपासाठी ठरला ‘विनिंग पॉईंट’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘ती’ चूक : आमदार महेश लांडगे यांचा खुला सामना
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ‘पवार पॅटर्न’ चालणार, असा दावा केला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे पाणीपत झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुन पराभव झाला. ‘‘स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर’’ हा भाजपा आणि आमदार महेश लांडगे यांनी तयार केलेला ‘‘सेंटिमेंट’’ यशस्वी ठरला आणि भाजपाने निर्विवाद बहुमत घेतले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली. सुरूवातीला विकासाच्या मुद्यांवर निवडणूक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पवार यांनी भ्रष्टाचाराचे बेच्छुट आरोप करीत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना ‘टार्गेट’ केले. परिणामी, ही लढत ‘‘बारामतीचा दादा विरुद्ध पिंपरी-चिंचवडचा दादा’’ अशी तयार झाली.
आमदार महेश लांडगे यांनी 2014 पासून राष्ट्रवादीशी फारकत घेतली. त्यावेळी त्यांनी अपक्ष विधानसभा लढवली आणि जिंकलीसुद्धा होती. मात्र, 2017 ची महापालिका, 2019 ची विधानसभा आणि लोकसभा, त्यानंतर 2024 ची विधानसभा आणि लोकसभा अशा निवडणुकांमध्ये लांडगे यांनी राजकीय टीकांना उत्तर देणे टाळले. मात्र, 2026 ची महापालिका निवडणूक त्यांनी अक्षरश: अंगावर घेतली. पवार यांनी केलेल्या प्रत्येक टिकेला प्रत्त्युत्तर देण्याची त्यांची भूमिका पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रभरात गाजली. ‘‘आम्ही स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर बारामतीच्या पायाशी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही..‘‘ अशी घोषणा लांडगे यांनी पिंपरीतील सभेत दिली. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र आणि आणि राज्य-परराज्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांचा स्वाभिमान जागा झाला.
‘‘ट्रोल’’ करणे राष्ट्रवादीला भोवले…
निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे या सामना रंगात आला. त्यावर महेश लांडगे यांनी एकेरी शब्दांत उल्लेख केल्याचा ‘सेंटिमेंट’ करण्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण राष्ट्रवादी महेश लांडगेंवर तुटून पडली. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना ‘ट्रोल’ करण्यात आले. यामुळे महेश लांडगे यांच्या प्रति पिंपरी-चिंचवडकरांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. राज्याचा बडा नेता शहरातील नेत्याला ‘टार्गेट’ करीत आहे, असा ‘मॅसेज’ तळागाळात गेला. त्याचा फायदा भाजपाला मोठ्या प्रमाणात झाला.
‘‘स्क्रिप्ट’’वर बोलणे पटले नाही…
2024 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांनी सुरू केलेली भ्रष्टाचारांच्या आरोपांची ‘स्किप्ट’ वाचण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या राज्याच्या नेत्याने केले. त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील सर्वाधिक सभा भोसरी मतदार संघात घेतल्या. मात्र, परिणाम णाला नाही. कारण, एकच स्क्रिप्ट आणि तेच-तेच आरोप यामुळे नागरिकांनी त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. पिंपरी-चिंचवडमध्ये 25 वर्षे सत्तेत असताना विकासाच्या मुद्यांवर अजित पवार बोलले नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना अजित पवारांचे ‘‘स्क्रिप्ट’’ नुसार बोलणे पटलेले नाही, ही बाब अधोरेखित होते.
पक्ष प्रवेशच्या रणनितीला ‘चेकमेट’…
निवडणुकीच्या सुरूवातीला महायुती होणार नाही. यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अजित पवार यांनी पुण्यात भाजपातील नाराजांचा पक्षप्रवेश करुन घेतला. सुरूवातीला 5-6 नगरसेवक त्यानंतर 20 पदाधिकारी यांना राष्ट्रवादीत सामावून घेतले. याला तोडीस तोड उत्तर देत महेश लांडगे यांनी मुंबईत मोठा पक्षप्रवेश घेतला. जवळपासून 22 माजी नगरसेवक भाजपात दाखल झाले. त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवेश घेतले. त्यानंतर भाजपाने पक्षकार्यालयात प्रवेशाचा धडाका दिला. शेट्टी कुटुंबीय आणि बाबर कुटुंबियांचा प्रवेश झाला. त्यानंतर चऱ्होलीतील तापकीर दांम्पत्याचा प्रवेशही झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश रणनितीला महेश लांडगे यांनी वेळोवेळी ‘चेकमेट’ दिला. त्यामुळे भाजपाचा ‘कॉन्फिडन्स’ कायम राहिला.
पवार कुटुंबाची एकजूट पण…
महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अजित पवार एकटेच लढत होते, तर त्यांचे स्थानिक पातळीवरील शिलेदार तोंडावर बोट ठेवून होते. त्यामुळेही अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे मागील वेळी ७७ वर असणारे भाजपचे संख्याबळ ८३ वर जाऊन पोहोचले. अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा विकासाचा मुद्दा लावून धरल्याने अपेक्षित यश मिळवण्यात भाजपला यश मिळाले. दुसरीकडे महेश लांडगे यांनी संघटनात्मक बांधणी केली. प्रभाग रचना, आरक्षण आणि त्यानंतर निवडणूक रणनिती याचे प्रभावीपणे ‘मॅनेजमेंट’ केले. याउलट, पवार कुटुंबातील मातब्बर नेत्यांनी शहरात दौरे केले. पण, त्याचा परिणाम झाला नाही.
‘मैत्रीपूर्ण लढत’ वगैरे भ्रामक कल्पना…
निवडणुकीत ‘मैत्रीपूर्ण लढत’ वगैरे काही नसते. असतो तो सरळ सामना! निवडणूक ही निवडणूकच असते. त्यात सगळी आयुधे-शस्त्रे-अस्त्रे वापरावी लागतात. कारण ‘जो जिता वही सिकंदर’, हे अजित पवार यांना पक्के माहीत होते. तरीही शहरातील काही कथित राजकीय विश्लेषकांच्या लेखी भासणारी ‘नुरा कुस्ती’ त्यांनी प्रतिष्ठेची केली. शेवटी-शेवटी तर ‘एकमेकांवर जहरी टीका न करण्याचा शब्द अजित पवार यांनी पाळला नाही’, असा पत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘ओपन’ करावा लागला. फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांना ‘बाय’ दिला, अशीही चर्चा झाली; पण ती नुसतीच पारावरची ठरली. शहरातील काही पत्रपंडित आणि कथित चाणक्यांनी चुकीच्या ‘‘स्क्रिप्ट’’ आणि ‘‘इनपूट’’ देवून अजित पवार सारख्या राज्याच्या नेत्याला अक्षरश: गल्लीबोळात फिरवले.




