To The Point : चिंचवडमध्ये घराणेशाहीत असणाऱ्यांनाच आता ‘घराणेशाही’ आठवली!
भाजपा निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून घरभेदींबाबत नाराजीचा सूर!
![To The Point: In Chinchwad, those who have been in the corporatorship for 25-30 years have now remembered 'dynasty'!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/BJP-Chinchwad-780x470.jpg)
पिंपरी : विशेष प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा निवडणुकीत जगताप कुटुंबियांच्या घराणेशाहीच्या मुद्यांवर काही माजी नगरसेवकांनी पक्षविरोधी कृत करण्यास सुरूवात केली आहे. जगताप कुटुंबामध्ये उमेदवारी नको, असा दावा केला जात आहे. मात्र, ‘‘राष्ट्र प्रथम…’’ या विचाराने काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीसह भाजपा परिवारातील कार्यकर्त्यांमधून अशा भूमिकांबाबत नाराजी व्यक्त होत आहे. किंबहुना, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांचा ‘बंदोबस्त’ करावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विविध मतदारसंघातील नेते, इच्छुक तयारीला लागले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप कुटुंबाला पुन्हा उमेदवारी निश्चित मानली जाते. अशाचत दोन माजी नगरसेवकांनी बैठक घेऊन जगताप कुटुंबात उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.
‘‘जगताप कुटुंबातील व्यक्तींना सोडून आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी, तरच आम्ही पक्षाचे काम करू..’’ असा खुला विरोध संबंधित माजी नगरसेवकांनी घेतला. मात्र, सदर बैठकीला उपस्थित असलेल्या माजी नगरसेवकांपैकी अनेकांना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महानगरपालिका निवडणुकीत तिकीट दिले. भावाप्रमाणे वागवले. स्वत:च्या ताटात जेवायला घातले. मात्र, जगताप यांच्या निधनानंतर अनेकांनी पाठ फिरवली.
महत्त्वाचे म्हणजे, स्वत:च्या घरात, कुटुंबात, नातेवाईकांमध्ये नगरसेवकपद २५- ३० वर्षे असतानाही आपण घराणेशाहीवर बोलतो. जगताप कुटुंबातील उमेदवारीबाबत ज्यांनी बैठक घेतली. त्यांच्यामध्ये जे मान्यवर होते. त्यांचे आजोबा प्राधिकरणाचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच, जे आक्रमकपणे घराणेशाहीवर बोलत होते. त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका आहेत. त्यांचे भाऊ व जावईसुद्धा आता भावी नगरसेवक म्हणून कामाला लागले आहेत. याबाबत आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, अशी खंतही भाजपाच्या निष्ठवंतांकडून व्यक्त केली जात आहे.
निवडणून येण्याची क्षमता हीच जगताप कुटुंबियांची ताकद…
जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारी नको. या मुद्याला ‘‘घराणेशाही’’ चा आधार दिला जात आहे. परंतु, एखादे कुटुंब राजकारण-समाजकारणात निरंतर समर्पण भावनेतून काम करीत असेल, तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. किंबहुना, २०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी बलाढ्य राष्ट्रवादीला आव्हान देत महापालिकेत भाजपाचे ‘कमळ’ फुलवले होते. अगदी व्हँटिलेटरवर असतानाही रुग्णवाहिकेमधून दोनदा मुंबईपर्यंत प्रवास केला आणि राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करीत पक्षनिष्ठा महाराष्ट्राला दाखवून दिली. २०१४ मध्ये शहरात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही भाजपामध्ये प्रवेश केला आणि पक्षाची पक्षाची ताकद वाढवली होती. मात्र, राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी जगताप कुटुंबाला ‘टार्गेट’ केले जात आहे. किंबहुना, निवडून येण्याची क्षमता या मुद्यावर जगताप कुटुंबात उमेदवारी निश्चित केली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
पक्षविरोधी चौकडीचा बंदोबस्त करण्याची मागणी…
ज्यांच्या घरांत वषानुवर्षे नगरसेवकपद, पक्षातील मानाचे पद असतानाही नातेवाईक- आप्तेष्ठांना नगरसेवक करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यांना ‘घराणेशाही’बाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. २०१७ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावून स्वागत करणारे आज पक्षाला निष्ठेची भाषा शिकवत आहेत. त्याच त्या चार लोकांच्या चौकटीमुळे पक्षाची बदनामी होत आहे. पक्ष संघटनात्मक कार्यात त्यांचा कसलेही योगदान नाही. त्यामुळे संबंधित चौकडीचा पक्षशिस्त भंग केल्याबद्दल योग्य तो ‘बंदोबस्त’ करावा, अशी मागणी भाजपाच्या निष्ठावंतांकडून पक्षश्रेष्ठींकडे केली जात आहे.