काश्मीरमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार
श्रीनगर |
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्य़ात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे ३ दहशतवादी ठार झाले. यात ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांपैकी एक असलेला मुदासिर पंडित आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. ठार झालेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या संघटनेचे वरिष्ठ कमांडर्स होते, असे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले. या दहशतवाद्यांचा अनेक हत्या व हल्ल्यांमध्ये समावेश असल्याने पोलीस व इतर सुरक्षा दलांसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची होती, असेही ते म्हणाले.
सोपोरमधील दोन मोठय़ा हल्ल्यांचा यात समावेश होता. २९ मार्चला झालेल्या हल्ल्यात भाजपचे दोन नगरसेवक व एक पोलीस मारला गेला होता; तर १२ जूनला झालेल्या हल्ल्यात २ पोलीस व २ नागरिक ठार झाले होते. बारामुल्लातील सोपोरच्या गुंड ब्रथ भागात पंडितसह किमान ३ दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी रविवारी रात्री या भागाला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली होती. या वेळी झालेल्या चकमकीत दीर्घ काळापासून सक्रिय असलेल्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
मुदासिर पंडित ऊर्फ उमेर ऊर्फ मास भाई हा १९ जूनपासून या भागातील लष्कर-ए-तैयबाचा कमांडर होता. त्याच्याविरुद्ध १८ गुन्हे दाखल होते. सुरक्षा दलांचे ९ कर्मचारी, ४ नागरिक, दोन माजी दहशतवादी, ३ सरपंच आणि २ फुटीरवादी यांच्या हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता. पाकिस्तानी नागरिक असलेला दुसरा दहशतवादी असरार ऊर्फ अब्दुल्ला हा बऱ्याच काळापासून पंडितसोबत होता. तिसरा खुर्शीद मीर हा सोपोरचा रहिवासी असून तो जवानांच्या हत्यांमध्ये सहभागी होता.