breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

‘‘हे स्मितहास्य अनेकांची झोप उडवणार!’’ : माजी आमदार विलास लांडे ‘अपक्ष’ निवडणूक लढवणार!

लोकसभा रणसंग्राम: शिरुर लोकसभा मतदार संघात तिरंगी लढतीची शक्यता

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची अधिकृत उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या मतदार संघातून तीव्र दावेदार असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार विलास लांडे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढायचीच… असा निर्धार केल्याचे चित्र आहे.

अजित पवार यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि महायुतीची अधिकृत उमेदवारी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित होणार यावर त्यांच्या राजकीय विरोधक आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीच घोषीत केले. त्यासाठी मोहिते पाटील आणि आढळरावांमध्ये समेट घडवून आणण्यात आला आहे.

मात्र, या मतदार संघातून उमेदवारीसाठी दावा करणारे माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारीसाठी डावलण्यात आल्यामुळे भोसरी मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांचा दिल्ली दौरा झाला की दोन ते तीन दिवसांत महायुतीचे उमेदवार ठरतील. आढळराव पाटलांच्याबाबतचा निर्णयही दोन ते तीन दिवसांत जाहीर होईल. पण, आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून प्रखर विरोध आहे.

दरम्यान, माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली जात आहे. त्यामध्ये ‘‘ हे स्मित हास्य अनेकांची झोप उडवणार’’ असे म्हणत शिरुर लोकसभा मिशन 2024 असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विलास लांडे अपक्ष म्हणून लढणार असे बोलले जात आहे. विलास लांडे यांनी याआधीही अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आहे. प्रचंड अनुभव आणि शिरुरच्या ग्रामीण भागात असलेला जनसंपर्क आणि नाती-गोती ही लांडे यांच्या जमेची बाजू आहे. त्यामुळे विलास लांडे काय भूमिका घेतात? याकडे शिरुर लोकसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विलास लांडे समर्थकांची घुसमट…

विलास लांडे भोसरी विधानसभा मतदार संघात सुमारे ४५ ते ५० हजार मतांचे धनी आहेत. भोसरी, खेड विधानसभा मतदार संघात लांडे समर्थकांचे जाळे आहे. यापूर्वी दोनदा लांडे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाची मशागत केली आहे. आढळराव पाटील जरी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढणार असतील, तरी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्यांचा प्रचार करणार याबाबत खात्री नाही. तसेच, भाजपाचे स्थानिक नेते आणि आढळराव पाटील यांचाही फारसा सलोखा नाही. याउलट, विलास लांडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या वादात विलास लांडे यांचा फायदा होवू शकतो. दुसरीकडे, लांडे समर्थकांची महायुतीमध्ये प्रचंड घुसमट होत असल्यामुळे तळवडे ते दिघी भागातील अनेक शिलेदार महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार गटाकडे जातील. त्यामुळे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे एकाकी पडतील, असा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button