breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

“महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला हे शोभेसं नाही”

मुंबई |

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आलेल्या १२ नावांची यादी अखेर सापडली आहे. राजभवनातून फाईलीचा शोध लागत नसल्याचं सांगण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. तिथे कोणतं वादळ आलं आणि त्यात ती गायब झाली? का तिथे भुतप्रेत आलं आणि घेऊन गेली अशी विचारणा त्यांनी केली होती. दरम्यान फाईल सापडल्यानंतर आता त्यांनी आनंद व्यक्त केला असून पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. फाईलवर राज्यपाल सही करतील तेव्हा संपूर्ण राजभवनला आम्ही पेढे वाटू. फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही आणि भूतं असली तर त्यांच्या आसपास असावीत. उच्च न्यायालयाने फाईल वर अद्याप निर्णय का होत नाही असा प्रश्न विचारला आहे, ती फाईल बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे का?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

“ही फाईल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने एकमतानं १२ सदस्यांची नावं दिलेली आहे. त्यावर आठ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेसं नाही. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी त्यांच्या कामात गतीमानता दाखवली तर महाराष्ट्राची परंपरा गतिमान राहील,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. “टुलकिट प्रकरणावरुन देशभरात चर्चा सुरू आहे. पण सगळ्या समाजमाध्यमांचा वापर भाजपाने विरोधकांविरोधात केला आहे. प्रकरण त्यांच्यावर उलटल्यावर धाड टाका, याला पकडा असं सगळं सुरू आहे. आम्हीदेखील मजा पाहत आहोत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “मोहन भागवत आदरणीय आहेत. अनेक विषयावर त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावं अशी आमची अपेक्षा असते. कारण त्यांच्या भूमिकेला, मताला या देशात आजही महत्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेत वाहून आली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत . हा विषय हिंदुत्वाचा होता, राममंदिराइतकाच महत्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा जनतेला होती. देशात आज जे सगळं काही सुरु आहे त्यावर आपलं मत व्यक्त करावं,” असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button