गुरु आणि वडील चोरणारी लोकंही आहेत, उद्धव ठाकरें यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला
![There are also people who steal gurus and fathers, Uddhav Thackeray's indirect jab at Chief Minister Eknath Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Udhav-Thakre-780x470.jpg)
मुंबईः आपल्याकडं गुरु विसरणारी लोकं तयार झाली आहेत. गुरु आणि वडील चोरणारी लोकंही आहेत. चोरी करुद्या, पण संस्कार कधी चोरु नयेत. संस्कार हे जन्मजात असावे लागतात, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. मीरा-भाईंदर येथील जैन मंदिराला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.
“बाळासाहेब ठाकरेंचं भरपूर चाहते होते. त्यांना चाहत्यांची आवश्यकता कधीही पडली नाही. कोठेही गेलं, तरी चाहतेच चाहचे असायचे. देशात बाळासाहेबांची तेव्हापासून सुरु झालेली हवा आजही काय कायम आहे,” असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “कठीण काळात कोण बरोबर येतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण, पुजा असली की, सर्वजण तीर्थप्रसादाला येतात. पण, संकटसमयी कारणे सांगून दूर पळतात.”
“मी कधीच संकटाला संकट मानत नाही. संकटात संधी शोधण्याचं काम करतो. जो मर्द असतो, त्याला लढाई लढण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे विरोधक जेवढा ताकदवान असेन तेवढी लढाई लढण्यास हिंमत येते. अन् ही लढाई आम्ही जिंकणारच,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
“२५ वर्षे आमचे मित्र राहिलेले, आज ज्या रस्त्याने जात आहेत, तो मार्ग आमचा नाही. जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं, ते आता तोडून-मोडून टाकलं जात आहे. ते स्वप्न आणि हिंदुत्व आमचं नव्हतं. धर्मावरून लोकांची दिशाभूल करायची आणि आपल्या ताब्यात ठेवयाचं, हे राजकारण सुरु आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी आहे, मग देशात का लागू करत नाही. महाराष्ट्रात माता म्हणायचं आणि बाजूच्या राज्यात जाऊन खाता, हे कोणतं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आपण माणूस म्हणून जन्म घेतला असून, धर्म नंतर आपल्याला चिकटला आहे. त्याच धर्माचा घेऊन देशावर कब्जा करायचा आणि सर्वांना गुलाम करायचं सुरु आहे. आताच आपण डोळे उघडले नाहीतर; परत मिटलेले डोळे कधीच उघडता येणार नाही. त्यामुळे आतातरी सर्वांनी जागं व्हावं,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.