बोपखेलवासीयांच्या संघर्षाला अखेर ‘यश’ : बहुप्रतिक्षित रस्त्याचे लोकार्पण!
आमदार आण्णा बनसोडे यांचा यशस्वी पाठपुरावा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती
![The struggle of Bopkhel residents is finally 'success': Inauguration of the long awaited road!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Bopkhel-780x470.jpg)
पिंपरी : मुळा नदीवर बोपखेल येथे अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाचे आज लोकार्पण झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार आण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने झालेल्या सोहळ्यात बोलपखेलचा महत्त्वाप्रश्न मार्गी लागला आहे.
बोपखेल पुलासाठी आमदार बनसोडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. बोपखेल, गणेशनगर , रामनगर या भागातील विकासाकामाबाबत महापालिका प्रशासनासोबत वारंवार बैठकाही घेतल्या आहेत. पिंपरी विधानसभेचा अविभाज्य भाग असलेल्या बोपखेल गावातील पायाभूत सोयी-सुविधांसाठी बनसोडे कायम आग्रही राहिले आहेत. संरक्षण विभागाची ना हरकत दाखला, कागदपत्रांची पूर्तता आणि प्रशासनाकडून पुलाचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आमदार बनसोडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलवासीय वर्षानुवर्षे दापोडी येथील सीएमईच्याहद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करत होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. तेव्हापासून बोपखेलवासीयांना पिंपरी चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. आता हा प्रश्न कायमस्वरुपी सुटला आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न…
बोपखेल परिसर २०१५ मध्ये रस्त्याअभावी मुख्य शहरापासून दुरावल्याची भावना स्थानिक नागरिकांची होती. CME दापोडी मधून जाणारा रस्ता सुरक्षेच्या कारणावरून कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. त्यावेळी बोपखेलवासीय एकजुटीने रस्त्यावर उतरले त्यांना त्यांचा हक्काचा रस्ता हवा होता. मात्र, देशाची सुरक्षितता व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्यांचा संघर्ष आजतागायत सुरू होता. दरम्यानच्या काळात २०१५ मध्ये झालेल्या आंदोलनात जवळपास २०० पेक्षा जास्त बोपखेल वासीयांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, यासाठीही आमदार आण्णा बनसोडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.