breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सव्वादोन कोटींपेक्षा अधिक नागरिकांची दुसरी लस शिल्लक- आरोग्यमंत्री राजेश टोपे

  • लशींचा अपुरा पुरवठा

जालना |

केंद्र सरकारकडून आवश्यकतेएवढ्या करोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा होत नसल्याने राज्य सरकारपुढे अडचण निर्माण झाली आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात चार कोटी ६३ लाखांपेक्षा अधिक लशींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी तीन कोटी ४५ लाख ३० हजारांपेक्षा अधिक जणांना पहिली मात्रा दिली आहे. तर जवळपास एक कोटी १८ लाख ४६ हजार जणांना दोन्हीही डोस दिलेले आहेत. पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ३४ टक्के नागरिकांचे दुसरे लसीकरण आतापर्यंत झालेले आहे. तर दोन कोटी २६ लाखांपेक्षा अधिक (६६ टक्के) व्यक्तींचे अद्याप दुसरे लसीकरण व्हायचे असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ते म्हणाले की, राज्यास आवश्यकतेएवढी लशीची मात्रा केंद्राकडून उपलब्ध होत नाही. दररोज १० ते १५ लाखांच्या दरम्यान लसीकरण करण्याची राज्याच्या आरोग्य विभागाची क्षमता आहे. परंतु तेवढा पुरवठा होत नसल्याने लसीकरण कमी होत आहे. गेल्या ४ ऑगस्ट रोजी राज्यात जवळपास सव्वादोन लाख, ५ ऑगस्ट रोजी पाच लाख १७ हजार आणि ६ ऑगस्ट रोजी तीन लाख ४५ हजार लशींच्या मात्रा राज्यात देण्यात आल्या.

गेल्या शुक्रवारपर्यंत राज्यात जवळपास चार कोटी ६४ लाख पहिल्या आणि दुसऱ्या मात्रा देण्यात आल्या. गरजेएवढ्या लशींच्या मात्रा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटू, असे आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी जवळपास तीन लाख ६० हजार हेल्थ केअर वर्कर्सची लशीची दुसरी मात्रा घेणे बाकी होती. पहिली मात्रा घेतलेल्या २१ लाख २६ हजार ५७७ फ्रंटलाइन वर्कर्सपैकी ९ लाख ४ हजार ८२७ दुसरी मात्रा अद्याप देणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.

निर्बंधांचा विचार शास्त्रीय आधारावर

करोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध शिथिल करण्याचा विचार शास्त्रीय आधारावर होता. साथरोगतज्ज्ञ, राज्य कृती दल, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग इत्यादींच्या सल्ल्यानुसार निर्बंधांच्या शिथिलतेचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागतो. निर्बंध लादण्याची हौस सरकारला नाही. परंतु जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. उद्या तिसरी लाट आली तर दोष राज्य सरकारलाच दिला जाईल. मुख्यमंत्र्यांनी रुग्णवाढीचे प्रमाण लक्षात घेऊन राज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध मोठ्या प्रमाणावर शिथिल केलेले आहेत. मुंबईतील लोकल प्रवासाच्या संदर्भातही करोना परिस्थिती पाहून ते योग्य वेळी निर्णय घेतील. लोकल प्रवासासाठी लशीच्या दोन मात्रा घेणाऱ्यांना सवलत द्यायचा निर्णय घ्यायचा म्हटले तर त्यासाठी प्रवाशांची अशी तपासणी करण्यासाठी यंत्रणेची व्यवस्था करावी लागेल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button