‘सांगली पॅटर्न’ चे स्वप्न भंगले : स्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचा दारुन पराभव!
- पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपाने राष्ट्रवादीचे मनसुबे उधळले
- शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामधील गट-तट आणि नाराजीचा फायदा घेत स्थायी समिती सभापती निवडणुकीत ‘सांगली पॅटर्न’ यशस्वी करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्थात महाविकास आघाडीचे मनसुबे भाजपाने उधळून लावले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत भाजपाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यादृष्टीने जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत होती. मात्र, अखेर भाजपाने गृहकलह शांत करीत सभापतीपदी ॲड. नितीन लांडगे यांना विराजमान केले आहे.
दरम्यान, शुक्रवारी, दि. ५ रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार नितीन लांडगे यांना स्थायी समिती सदस्यांच्या एकूण १६ पैकी १० मते मिळाली आहेत. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण भालेकर यांना ५ मते मिळाली आहेत. भाजपाचे नाराज सदस्य रवि लांडगे यांनी अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपाचे एक मत कमी झाल्याचे पहायला मिळाले आहे. पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
भाजपामधील नाराज आणि इच्छुक यांची मोट बांधून स्थायी सभापतीच्या निवडणुकीत भाजपाला मात देत राष्ट्रवादीचा उमेदवार सभापतीपदी बसवण्यासाठी शहर राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांनी कंबर कसली होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही कानावर घालण्यात आले होते. मात्र, भाजपा सदस्य अभेद्य राहीले. आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप जोडीने गृहकलह सामोपचाराने मिटवला. त्यामुळे राष्ट्रवादीला बँकफूटवर यावे लागले.
दरम्यान, स्थायी समिती सभापती निवडीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक योगेश बहल, वैशाली घोडेकर आदी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी नवनिर्वाचित सभापती नितीन लांडगे यांना शुभेच्छा दिल्या.
स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यात भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक आहे. भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे १६ सदस्य स्थायी समितीत आहेत.





