पंतप्रधान नरेंद्र मोदी-मुख्यमंत्री योगींचे फोटो मॉर्फ करणारा अखेर गजाआड
![The photo morpher of Prime Minister Narendra Modi-Chief Minister Yogi is finally done](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Image-2023-04-12-at-14.23.36-780x470.jpeg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी एका तरुणाला झारखंडमधील रांची येथून अटक केली. या तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो मॉर्फ करून त्याचे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
शमीम जावेद अन्सारी (रा. रांची, झारखंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड सायबर विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शमीम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे फोटो मॉर्फ केले. मॉर्फ केलेल्या फोटोचे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर अपलोड केले. दरम्यान माजी खासदार अमर साबळे यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले. त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यांनतर हा सर्व प्रकार एकच व्यक्तीने केल्याचे उघड झाले.
फोटो मॉर्फ करून ते सोशल मीडियावर अपलोड करणारा व्यक्ती रांची येथे असल्याची माहिती सायबर पोलिसांनी मिळवली. त्यानुसार रांची पोलिसांच्या मदतीने पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी शमीम अन्सारी याला ताब्यात घेतले. जानेवारी मध्ये उघडकीस आलेल्या प्रकरणाचा पोलीस तीन महिन्यांपासून तपास करीत होते. तीन महिन्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
शमीम अन्सारी याचे केवळ चौथी पर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या तो मिळेल ते काम करत होता. युट्युब पाहत असताना अशा प्रकारे फोटो मॉर्फ करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यांनतर त्याने अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर अपलोड केले. केवळ कॉमेडी करण्यासाठी आपण हे कृत्य केले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.