पिंपरी विधानसभेतून महायुतीचा उमेदवार आण्णा बनसोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
निवडणूक रणसंग्राम : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून थेट ‘एबी फॉर्म’ चे वाटप
![The name of Anna Bansode, the Mahayutti candidate from the Pimpri Legislative Assembly, has been sealed!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Anna-Bansode-3-780x470.jpg)
पिंपरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्षाने २० उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. यामध्ये बारामतीतून अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), चेतन तुपे (हडपसर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), अतुल बेनके (जुन्नर), दत्तात्रय भरणे (इंदापूर) आणि अण्णा बनसोडे (पिंपरी) यांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाने आपली ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर सोमवारी दुसऱ्याच दिवशी अशी कोणतीही यादी जाहीर न करताच राष्ट्रवादी काँग्रेसने २० हमखास उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप करून टाकले. अजित पवार गटाने सोबत आलेल्या सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महायुतीच्या जागा वाटपात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा मिळाव्यात, यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी रणनीती आखली होती. पश्चिम महाराष्ट्रासह राष्ट्रवादीला किमान ७५ जागा मिळव्यात असा आग्रह त्यानुसार लावून धरण्यात आला. ही संख्या राष्ट्रवादीने ६५ जागांवर खाली आणली. तरीही भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी नमते घेतले असून शेवटी अजित पवार गटाच्या पदरात ५५ ते ६० जागा पडणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पक्षाचे एकमेव उमेदवार विजयी झाले. पश्चिम महाराष्ट्राखालोखाल ताकद वाढवण्यासाठी कोकणात १२ ते १५ जागांसाठी तटकरे यांचा आग्रह होता. परंतु या भागात भाजपही आपली ताकद वाढवत आहे. परिणामी कोकणात राष्ट्रवादीला १० जागा मिळणार असल्याचे समजते. त्यात मुंबईच्याच चार जागांचा समावेश आहे. नवाब मलिक (मानखुर्द) सना नवाब मलिक (अणुशक्तीनगर), झिशान सिद्दीकी (वांद्रे) यांची उमेदवारी निश्चित आहे. नरेंद्र वर्मा यांनीही उमेदवारी मिळण्यासाठी ताकद लावली असून मुंबादेवीमधून उमेदवारी मिळावी म्हणून ते आग्रही आहेत.
एबी फॉर्म मिळालेले उमेदवार…
अजित पवार-बारामती, छगन भुजबळ-येवला, दिलीप वळसे पाटील-आंबेगाव, चेतन तुपे हडपसर, सुनील टिंगरे-वडगाव शेरी, अतुल बेनके-जुन्नर, हसन मुश्रीफ-कागल, धनंजय मुंडे-परळी, नरहरी झिरवाळ – दिंडोरी, अनिल पाटील – अंमळनेर, धर्मरावबाबा आत्राम अहेरी, अदिती तटकरे – श्रीवर्धन, संजय बनसोडे – उदगीर, दत्तात्रय भरणे – इंदापूर, माणिकराव कोकाटे – सिन्नर, हिरामण खोसकर – इगतपुरी, दिलीप बनकर – निफाड, सरोज अहिरे – देवळाली, अण्णा बनसोडे – पिंपरी तसेच माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित.