तानाजी सावंत यांच्या विधानानंतर महायुतीमध्ये धुसफूस, अजित पवार गटाचा इशारा
![The leader of Ajit Pawar group said that it is better to be out of power than to listen to Tanaji Sawant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Ajit-Pawar-8-780x470.jpg)
Ajit Pawar | सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यभर पटले नाही. आता त्यांच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसलो आहे. पण बाहेर आलो की उलट्या होतात, असं तानाजी सावंत म्हणाले. त्यानंतर आता अजित पवार गटाने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, असा इशाराच अजित पवार गटाने दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडू, आपल्याला सत्तेची गरज नाही. तानाजी सावंत यांचा आम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे? एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले. त्याच भाजपाच्या नेत्यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले. हा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाने घेतला होता. महायुतीमुळेच तानाजी सावंत मंत्री आहेत. हे त्यांनी विसरू नये. या पद्धतीने जर राष्ट्रवादीला कोण बोलणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही.
हेही वाचा – पोलीस आमदारांची गाडी धुताना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल
तानाजी सावंत यांच्या विधानानंतर विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, तानाजी सावंत राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांना उलट्या कोणत्या कारणामुळे होत असाव्यात, याबद्दल कल्पना नाही. त्याचा आरोग्याशी काही संबंध असू शकेल. पण महायुतीत असल्यामुळे उलट्या होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच त्यांचा इलाज करावा.
मंत्री तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?
मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही, असं तानाजी सावंत म्हणाले. ते धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलत होते.