breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला या देशाचे प्रमुख हजेरी लावणार

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. ९ जून रोजी पंतप्रधानपदाची ते शपथ घेणार आहेत. पंतप्रधानांचा हा शपथविधी सोहळा अनेक अर्थांनी खास असेल. या सोहळ्यात जगभरातील अनेक देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. देशातील स्वच्छता कर्मचारी आणि मजूर देखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. नरेंद्र मोदींच्या  शपथविधी सोहळ्यासाठी 8000 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या शपथविधी सोहळ्याला जगातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहू शकतात. भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आले आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ.मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या या नेत्यांना त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांच्याकडून मेजवानी देण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि मालदीवमध्ये तणाव असतानाच मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू हे देखील भारतात येणार आहेत. आजच ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकारीही भारतात येणार आहेत. बुधवारी मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले होते. मुइज्जू हे चीन समर्थक मानले जातात. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. मोहम्मद मुइज्जू सत्तेत आल्यानंतर तुर्की आणि चीनच्या दौऱ्यावर गेले होते.

मोदींच्या शपथविधीसाठी सफाई कामगार, मजूर, ट्रान्सजेंडर, केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी आणि विकसित भारताचे राजदूत यांना देखील आमंत्रण असणार आहे. रविवारी सुमारे आठ हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. रविवारी संध्याकाळी ६ वाजता हा सोहळा सुरु होणार आहे.

बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, मालदीव, मॉरिशस आणि सेशेल्सच्या प्रमुखांनी या समारंभाला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. अनेक देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या ठिकाणी आठ हजार पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  शनिवारपासून पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सर्व पाहुण्यांसाठी तिहेरी सुरक्षा कवच असणार आहे. गुरुवारपासूनच राष्ट्रपती भवनाच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या शिवाय दिल्लीत नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button