‘सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी..’; विधानसभेत विरोधकांची घोषणाबाजी!
![The government is starving, the farmers are starving... slogans of MLAs of Mahavikas Aghadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/ajit-pawar-and-mahavikas-aghadi-MLA-780x470.jpg)
शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधकांचा सभात्याग..
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विकासकामांना स्थगिती देणार्या सरकारचा धिक्कार असो… बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा… अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे… सरकार तुपाशी शेतकरी उपाशी…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.
एक लाख एकर क्षेत्र हवमान खराब झाल्यामुळे बाधित झालं आहे. आज सगळ्या विभागाचे आकडे आले आहेत. मुख्यमंत्री आश्वासन देतात की कांद्याची खरेदी सुरू झालीये, तशी ती झालेलीच नाहीये. बळीराजा त्रासलेला आहे. किंमती घसरल्यामुळे हस्तक्षेप करून खरेदी सुरू केली पाहिजे. सरकार म्हणतंय खरेदी सुरू झाली. पण तशी परिस्थिती नाहिये, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.