बोऱ्हाडेवाडी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील शाळा सत्यात उतरली!
परिसरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून व्यक्त होतेय समाधान

आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव
पिंपरी । प्रतिनिधी
बोऱ्हाडेवाडी परिसरातील विद्यार्थीना अखेर हक्काची शाळा मिळाली आहे. अनेक वर्षांपासून जुन्या धोकादायक शाळेच्या इमारतीत आणि पत्राशेडमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी यंदा सुसज्ज आणि प्रशस्त शाळेत दाखल झाले आहेत. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात झाला. याबाबत ‘‘विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील शाळा सत्यात उतरली..’’ अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.
बोऱ्हाडेवाडी येथील कै.महादू श्रीपती सस्ते मुले – मुलींची शाळा क्रमांक-१३ या महापालिका शाळेच्या इमारतीचे काम गेल्या प्रलंबित होते. इमारतीअभावी येथील विद्यार्थ्यांची परवड होत होती. याबाबत माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्याला आमदार महेश लांडगे यांची साथ मिळाली आणि शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते इमारतीचे उद्घाटन झाले. आता आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा नवीन शैक्षणिक वर्षात आणि नव्या इमारतीमध्ये स्वागत समारंभही झाला. त्यामुळे पालक आणि शिक्षकांसह विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नूतन इमारतीमध्ये शाळा दि. २१ जूनपासून शाळा सुरु झाली. चिमुकल्यांचा स्वागतोत्सव यावेळी साजरा कऱण्यात आला. रांगोळीच्या पायघड्या, रंगबेरंगी फुगे, फुलांची सजावट करत, विद्यार्थ्यांचे औक्षण करत उत्साह साजरा करण्यात आला.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे जगाला निरोगी आरोग्याचा संदेश!
शाळेच्या स्वागतोत्सव कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, उपअभियंता नरेश जाधव, कनिष्ठ अभियंता अनिल गडदे,संभाजी बोऱ्हाडे, नवनाथ बोऱ्हाडे, संजय सस्ते, बाळू सस्ते, विश्वास जैद,अशोक बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.

दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली…
माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे म्हणाल्या की, बोऱ्हाडेवाडीतील शाळेत वाडी व वस्त्यांवरील,संजय गांधी नगर मधील गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इथे फक्त पहिली ते आठवी पर्यंतच वर्ग सुरु होते. त्यामुळे नागरिकांना आपल्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी खाजगी शाळेत जावे लागत होते. खाजगी शाळा व त्याच्या अवाजवी खर्च हा या कुटूंबाना न पेलवणारा होता.यामुळे गेले अनेक वर्षांपासून येथील पालिकेच्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरु कऱण्याची मागणी करण्यात येत होती. आमदार महेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची नवीन इमारत आणि दहावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यामुळे माझ्या परिसरातील विद्यार्थ्यांना पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली होणार असल्याने पालक निश्चिंत झाले आहेत.
बोऱ्हाडेवाडी आणि परिसरातील सर्वसामान्य विद्यार्थींना शिक्षणाची सुविधा निर्माण झाली. शाळेच्या नवीन इमारतीमध्ये प्रशस्त वर्ग खोल्या, मुख्याध्यापक, शिक्षक कक्ष, प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह, सभागृह, प्रयोगशाळा, वाचनालय, भांडारगृह, प्रशस्त पार्किंग व खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध झाले आहे. समाविष्ट गावांतील विकासकामांच्या ‘बकेट लिस्ट’मधील आणख एक संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान आहे. केवळ कामांची घोषणा नाही, तर भूमिपूजन आणि उद्घाटनसुद्धा आमच्या हातूनच होईल, अशी गतीमान कार्यपद्धती आम्ही कायम ठेवली आहे.
महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.




