प्रचार शिगेला…शेवटचे तीन दिवस ठरणार निर्णायक!
![The campaign is over…the last three days will be decisive!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/bjp-ncp-pimpri-chinchwad-780x470.jpg)
चिंचवड पोटनिवडणूक : महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सामना रंगतदार
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
चिंचवड पोटनिवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे.प्रचारासाठी शेवटचे ३ दिवस उरले असल्याने सर्वच पक्ष आपला जोर लावताना दिसत आहेत. आताच्या घडीला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना अटीतटीचा दिसत असला, तरी शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या उमेदवाराला विजयीश्री मिळणार आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या नेत्यांनी जोर लावला आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ५१ टक्के लोक मतदान करतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातो. या निवडणुकीत सहणुभुती कमी प्रमाणात दिसत आहे. असे असले तरी ही निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशीच सध्याला दिसून येत आहे. महायुतीला नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव या भागात आघाडी मिळत आहे, तर महाविकास आघाडीला पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, रावेत, थेरगाव भागातून आघाडी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, महाविकास आघाडीतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना त्यांच्या स्वतःच्या प्रभागातूनच मताधिक्य राखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
मुस्लिम आणि दलित समाजाची मते महाविकास आघाडीच्या पाठिशी राहतील, असा दावा केला जातो. तर, मागासवर्गीय मतदार भाजपासोबत राहणार नाही, असेही म्हटले जात आहे. महाविकास आघाडीने प्रचारात जोर धरला असून, शेवटच्या टप्प्यातील रणनिती विजयी कोण होणार? यावर शिक्कामोर्बत करणार आहे.