तळवडे ते देहू फाटा रस्त्यासाठी आमदार लांडगे यांचा पुढाकार!
अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे काम करण्याची मागणी; महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन
पिंपरी : देहू- आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहु फाटा (चऱ्होली) ही पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दील मार्गावर खड्डयांचे साम्राज्य झाले असून, प्रशासनाने अत्याधुनिक पद्धतीने काम करावे, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देहू- आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहु फाटा (चऱ्होली) ही पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मार्गावर चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येणारे पाणी आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनचे काम याच रस्त्यावर झाले आहे. या कामामुळे रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत.
तळेगाव, चाकण एमआयडीची रहदारी मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावर होत असून, तळवडे ते चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉरमधील सर्वाधिक लोकवस्ती या भागात आहे. सध्यस्थितीला किमान १ लाखहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, सर्वसामान्य वाहनचालक, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तळवडे ते चऱ्होली भागातील वाढते नागरीकरण यामुळे पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करणे अत्यावशक आहे, असेही आमदार महेश लांडगे म्हटले आहे.
देहू- आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहु फाटा (चऱ्होली) रस्त्याच्या कामासाठी आगामी स्थायी समिती सभेत सल्लागार नियुक्तीला मंजुरी द्यावी. तसेच, निविदा प्रक्रिया राबवून अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी आहे. तसेच, या रस्त्यावरील वाहतूक, पार्किग व्यवस्था, संबंधित जोड रस्ते या सर्व बाबींचा सविस्तर प्रकल्प अहवाल आगामी १५ दिवसांत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी सूचना केली आहे. यावर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.