किरीट सोमय्यांना सुषमा अंधारेंचा टोला; म्हणाल्या, शिंदेंकडे सहा बंगले कसे?
मुख्यमंत्र्यांनी किती बंगले ठेवावेत याची काही नियमावली आहे का?
मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आक्रमक होत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले होते. मात्र, आता हे बंगले गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली होती. तसेच याप्रकरणी सोमय्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. दरम्यान, या आरोपाला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
किरीट सोमय्या जे काम करतात, ते प्रशंसेस पात्र असतं. फक्त ते आरंभशूर फार आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे. कारण ते चौकशी करतात, पण पुढे त्याचं काहीच होत नाही. राहिला प्रश्न १९ बंगल्याचा जर किरीटभाऊंचा टेस्ट बदलला असेल, ऐरवी ते उद्योगांबाबत बोलतात, आता जर त्यांना बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही त्यांनी बोललं पाहिजे, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.
सह्यांद्री, नंदनवन, रामटेक, वर्षा आणि शेजारचे दोन-तीन बंगले सुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती बंगले त्यांच्याकडे ठेवावेत, याची काही नियमावली आहे का? याबद्दल माहिती देऊन किरीटभाऊंनी माझ्या ज्ञानात थोडी भर घालावी, असा खोचक टोला सुषमा अंधारेंनी लगावला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती शेअर केली आहे. येणाऱ्या 2023 या नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले, अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुबई महापालिकेतील घोटाळे, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षात किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर असणार आहेत.