‘मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही’; आमदार सुरेश धस
![Suresh Dhas said that I did not ask for Dhananjay Munde's resignation.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Suresh-Dhas-and-Dhananjay-Munde-780x470.jpg)
Suresh Dhas | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. सुरेश धस यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सुरेश धस यांनी भेटी दरम्यान काय चर्चा झाली ते सांगितलं आहे. तसेच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली का? या प्रश्नालाही उत्तर दिलं आहे.
आमदार सुरेश धस म्हणाले, की वाल्मिक कराडच्या सगळ्या गँग मोक्कामध्ये गेल्या पाहिजेत. वाल्मिक कराडने लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवलं आहे. खाडे नावाच्या अधिकाऱ्याकडे दीड कोटी रुपये सापडले होते. त्याला वाल्मिक कराडने वाचवलं असा आरोप सुरेश धस यांनी केला. सुरेश धस यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर आरोप केले. तसंच मी येत्या दोन दिवसात या सगळ्यांची मालमत्ता किती आहे ते जाहीर करणार आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोळंकी यांनी राजीनाम्याची मागणी केली. मी आका आणि आकाचे आका म्हणत होतो. आका म्हणजे वाल्मिक कराड सगळ्यात आहे. वाल्मिक कराडची चौकशी झाली पाहिजे. खंडणीबाबत सातपुडा बंगल्यावर बैठक झाली हे मी आजही खात्रीने सांगतो. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा किंवा काय करायचं हे देवगिरीवर राहणाऱ्या अजित पवारांच्या हातात आहे, असं सुरेश धस म्हणाले.
मी किशोर फड, संगीत दिघोळे यांच्या मातोश्रींना आणि त्यांच्या पत्नींना भेटायला परळीला जाणार आहे. पाच वर्ष बीड जिल्ह्यांत काय चाललं आहे ते सगळ्यांना माहीत आहे. धनंजय मुंडे यांना सगळं माहीत आहे. आकांना त्यांच्या आकांनी पाठिंबाच दिला आहे, असं सुरेश धस म्हणाले. तसंच नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा का? असं विचारलं असता त्यांच्याकडे नैतिकताच शिल्लक नाही, असंही सुरेश धस म्हणाले.